Sanjay Raut : उद्या म्हणतील शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापनच केली नाही, बाळासाहेबांचा शिवसेनेशी संबंधच नाही, राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : शिवसेना भवनाचा ताबा घेण्याचा विचारही कुणी मनात आणू नये. सेना भवन, मातोश्री, सामना हे जर कुणाच्या डोक्यात असेल तर त्यांचे मेंदू तपासावे लागतील. नक्कीच त्यांनी वेगळा गट स्थापन केला. पण ती शिवसेना नाही. तो फुटीर गट आहे.
मुंबई: शिंदे गट आता शिवसेना भवनावर दावा करणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी (balasaheb thackeray) ज्या व्यवस्था करून ठेवल्या आहेत, त्या व्यवस्थेनुसार या संस्था चालतात. त्यांना महाराष्ट्रच तोडायचा आहे, म्हणून शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीतही जातो. यांचा काही भरवसा नाही. भांग प्यायलेली माणसं काहीही करू शकतात. नशेची, सत्तेची भांग जे पितात ते काहीही करतात. उद्या म्हणतील मातोश्री आमचं आहे, त्याचाही कब्जा करू. उद्या म्हणतील बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापनाच केली नाही. त्यांची वैचारीक पातळी एवढी गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेशी (shivsena) काहीच संबंध नाही असंही म्हणू शकतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजासहजी हार मानणार नाही आणि शरण जाणार नाही, हे माहीत असल्याने लोकांना भ्रमित करण्यासाठी विधाने केली जात आहेत, असा दावाही त्यांनी केला.
संजय राऊत यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. शिवसेना भवनाचा ताबा घेण्याचा विचारही कुणी मनात आणू नये. सेना भवन, मातोश्री, सामना हे जर कुणाच्या डोक्यात असेल तर त्यांचे मेंदू तपासावे लागतील. नक्कीच त्यांनी वेगळा गट स्थापन केला. पण ती शिवसेना नाही. तो फुटीर गट आहे. त्याला कायदेशीर मान्यता नाही. त्यांना आमदारकी वाचवायचे असेल तर अशा कुरापती कराव्या लागतील, अशी टीका राऊत यांनी केली.
न्यायाचा खून होणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळात उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे. त्या अस्वस्थतेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले. मुख्यमंत्री काही प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तरी न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती आहेत. त्यांच्याकडून राष्ट्रसेवाच घडेल. त्यांच्याकडून न्यायाचा खून होणार नाही. लोकशाहीचा खून होणार नाही याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार, खासदार शिवसेनेची ताकद नाही
शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आणि खासदार सोडून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. कारण आमदार आणि खासदार ही शिवसेनेची ताकद नाही. शिवसेना या सर्वातून पुन्हा उभी राहील. आज ज्यांच्या घराबाहेर पहारे लागले आहेत. त्यांना परत कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठिण करू. आमच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही. सोडून जाणारे पाहा. यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. संजय जाधव हे बंडखोरांसोबत जाणार असल्याचं चालवलं जात आहे. पण ते आमच्यासोबत आहे. त्यांचे नाव चॅनेलवाले चालवत असल्याने ते अस्वस्थ आहेत, असंही ते म्हणाले.