नवी दिल्ली: पंधरा दिवस उलटून झाले तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावर शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. ते काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका. मी काय म्हणतोय ते समजून घ्या. दोन जणांचं मंत्रिमंडळ 15 दिवसांपासून चाललंय. जगामध्ये लोकशाहीची एवढी चेष्टा कधी झाली नव्हती. प्रश्न एवढाच आहे की, एवढा मोठा तुमचा गट, एवढा मोठा भाजपा(bjp), इतकं मोठं बहुमत. मग मंत्रिमंडळ का इतक्या दिवसात स्थापन झालं नाही?, असा सवाल संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. भविष्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी दिसते. अपात्रतेची टांगती तलवार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, असा दावाही राऊत यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
राज्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व उरलं नाही, असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. त्यावरही त्यांनी पलटवार केला. आघाडीचं अस्तित्व येणारा काळ ठरवेल. शिवसेना, महाविकास आघाडी यांची ताकद, त्यांचं महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल. ते एखाद दुसरा नेता ठरवू शकत नाही. हे देशाची जनता ठरवेल. आज जे काय बुडबुडे फुटत आहेत, हवेत उडत आहेत. ते फार काळ राहणार नाहीत. हे तुम्हाला माहीत आहे. जनतेला माहीत आहे. भाजपच्या नेत्यांनाही माहीत आहे. तसं जर असतं तर 15 दिवसानंतर सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार जो टाळला जातोय तो टाळला गेला नसता, असं राऊत म्हणाले.
अपात्र आमदारांच्या कोर्टातील याचिकेवरही त्यांनी भाष्य केलं. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जो कायदा, नियम आहे. त्यावरच आम्ही भरवसा ठेवून आहोत. सर्वोच्च न्यायालयात न्याय मेलेला नाही. अजूनही रामशास्त्री आहेत. याचं प्रत्यंतर भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून शिवसेना संभ्रमात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. शिवसेना संभ्रमात नाही. शिवसेनेने अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदा घेतला नाही. एनडीएत असताना प्रतिभा पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला होता. एनडीएत असताना टीएन शेषण यांनाही पाठिंबा दिला होता. एवढेच नव्हे तर एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आश्चर्य वाटण्याचं संभ्रमित होण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले. या देशातल्या अनेकांनी असा पाठिंबा दिला आहे. हेमंत सोरेन यूपीएमध्ये आहेत. त्यांनीही मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. इतर अनेकांनी दिला आहे. ते यूपीएत आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.