नवी दिल्ली: शिवसेनेचे (shivsena) खासदार संसदेत आपला स्वतंत्र गट तयार करेल असा दावा भाजपकडून (bjp) केला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. प्रयत्न हे सर्व स्तरांवर सुरू असतात. उद्या जो बायडेनचा पक्षही आपल्यात सामावून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. किंवा ब्रिटनमध्ये ऋषी सनक हे पंतप्रधान होणार आहेत. ते आमच्याच पक्षाचे आणि गटाचे आहेत असं सांगितलं जाईल. या देशाच्या राजकारणाला काही अर्थ राहिला नाही. जगभरात कोणताही गट तयार झाला तरी तो आमचाच आणि आमच्यामुळेच, असं सांगितलं जाईल. आता या भूमिकेतून आणि मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे. हळूहळू महाराष्ट्र स्थिरस्थावर होईल, असं संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून 200 हून अधिक मते मिळतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यावरही राऊतांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला दादांचा दावा काय माहीत नाही. पण शिवसेनेने द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिल्याने त्यांच्या मताचा टक्का आधी होता त्यापेक्षा वाढेल, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर भाष्य केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत या आधी स्पष्ट केलं आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. शेकडो आदिवासी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाले आहेत. त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. ब्रिटिशांच्या काळात जंगलात, डोंगरावर आणि दऱ्याखोऱ्यात आदिवासींनी जे लढे दिले आहेत, त्या सगळ्याचं प्रतिनिधीत्व द्रौपदी मुर्मू करत आहेत. महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आमचे अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी आदिवासी समाजाचे आहेत. सगळ्यांच्या चर्चेतून जाणवलं. प्रथमच या समाजाला सर्वोच्च पदावर जायला संधी मिळत आहे. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि पक्ष प्रमुखांनी ताबडतोब पाठिंबा जाहीर केला, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेना संभ्रमात नाही. शिवसेनेने अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदा घेतला नाही. एनडीएत असताना प्रतिभा पाटील, शेषण आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आश्चर्य वाटण्याचं संभ्रमित होण्याचं कारण नाही. या देशातल्या अनेकांनी असा पाठिंबा दिला आहे. हेमंत सोरेन यूपीएमध्ये आहेत. त्यांनीही मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. इतर अनेकांनी दिला आहे. ते यूपीएत आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आमचा पाठिंबा एका आदिवासी महिलेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.