Sanjay Raut : ‘ते’ 40 आमदार तन, मन, धनाने भाजपमध्येच विलीन, शिवसेना सोडल्याचं जाहीर कराच; राऊतांचं बंडखोरांना आव्हान
Sanjay Raut : तुम्हाला शिवसेनेत राहायचे नाही, हे स्पष्ट केलं आहे. मग तुम्ही आता आशा प्रकारच्या चर्चा करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नका.
नाशिक: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी टीका केल्यानंतर बंडखोर आमदारांनी सोमय्यांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंवरील टीका खपवून घेणार नाही. सोमय्यांना आवरा, असा इशारा शिंदे गटातील आमदारांनी भाजपला दिला होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे. लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. हे त्यांचे डावपेच आहेत. लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी सर्व सुरू आहे. ते शिवसेनेत नाहीत. त्यांनी विधिमंडळात शिवसेनेचा गट स्थापन केला आहे. पण शिवसेनेशिवाय त्यांचं अस्तित्व नाही. ते भाजपमध्ये मनाने विलीन झाले आहेत. तनाने विलीन झालेत. धनाने तर कधीच झालेत. ते आमचे सहकारी होते. त्यांनी असे खेळ करू नये, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच हिंमत असेल तर शिवसेना सोडल्याचं जाहीर कराच, असं आव्हानही राऊत यांनी दिलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते. तुम्हाला शिवसेनेत राहायचे नाही, हे स्पष्ट केलं आहे. मग तुम्ही आता आशा प्रकारच्या चर्चा करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नका. तुमच्या अशा विधानांनी लोकांची दिशाभूल होणार नाही, असं राऊत म्हणाले. तुम्ही शिवसेना सोडली आहे. तुम्ही जर बोलला तर तुमची आमदारकी लगेच जाईल. तुम्हाला कोर्टात जाण्याची गरज नाही. मी शिवसेना सोडली असं बोलून दाखवावं. मी शिवसेनेचा आमदार नाही, असं जाहीर करावं किंवा राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक लढवावी. मग हवं ते बोला, असं आव्हानच त्यांनी दिलं.
तेव्हा का मुख्यमंत्रीपद दिलं नाही?
शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला नव्हता, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. त्यांचा हा दावा राऊतांनी फेटाळून लावला. अडीच वर्षापूर्वी भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आम्ही शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद दिलं असतं. त्यामुळे महाजनांवर हा आरोप करण्याची वेळ आली नसती. किती खोटं बोलतात. का युती तुटली? तुम्ही अडीच वर्षाचा करार पाळला असता तर शंभर टक्के युती राहिली असती. शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नच आला नसता. तुम्ही का दिलं नाही मुख्यमंत्रीपद. आता का दिलं? असा सवालही त्यांनी केला.
त्यावेळी महाजन नव्हते
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बंददाराआडील चर्चेचे महाजन हे अजिबात साक्षीदार नाहीत. अमित शहा आले तेव्हा मातोश्रीवर महाजन नव्हते. मी होतो, देवेंद्रजी होते आणि अजून काही नेते होते. मला महाजन यांना पाहिल्याचं आठवत नाही. असेल तर गर्दीत असतील ते. बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या, त्या उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या. बाळासाहेबांच्या खोलीत झालेल्या चर्चेविषयी ते कधीच खोटं बोलणार नाहीत. ते खोटं बोलतात असं कधीच घडलं नाही. ते खोटं बोलतात असं म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, असं ते म्हणाले.