Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक शिवसेनेतच राहणार की शिंदे गटात जाणार?; लवकरच घोषणा
Sanjay Mandlik : निवडणुकीला अडीच वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे सत्तेसोबत राहून जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी शिंदेंसोबत गेलं पाहिजे. कोरोना काळात निधी मिळाला नाही. त्यामुळे आता जास्तीत जास्त निधी मिळवून मतदारसंघाची कामे करण्यासाठी शिंदे गटासोबत गेलं पाहिजे.
कोल्हापूर: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड करून भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत प्रचंड गळती सुरू झाली असून शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. माजी आमदार, नगरसेवक आणि शिवसेनेच्या (shivsena) पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाला वाढता प्रतिसाद पाहून शिवसेना खासदारांमध्येही चुळबुळ सुरू झाली आहे. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी तर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) यांच्यावर शिंदे गटात जाण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मंडलिक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला मंडलिक यांनी दांडी मारल्याने मंडलिक शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. मात्र, मंडलिक यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून ते आपली अधिकृत भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत.
कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची हमीदवाडा इथल्या सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या कार्यस्थळावर बैठक पार पडली. दोन वर्ष कोरोनामुळे खासदारांना म्हणावा तसा निधी मिळालेला नाही. यापुढील काळात जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी शिंदे गटात सामील व्हावं, असा आग्रह काही कार्यकर्त्यांनी या बैठकीत धरला. तर काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन मंडलिक यांनी निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. बहुतांशी कार्यकर्त्यांनी या बैठकीत शिंदे गटात सामील होण्यावर जोर दिला. खासदार संजय मंडलिक यांनी स्वतः याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी आज झालेल्या बैठकीतील मतप्रवाह हे कार्यकर्ते मंडलिक यांना सांगणार आहेत. त्यामुळे खासदार संजय मंडलिक यापुढील काळात काय भूमिका जाहीर करणार याकडे जिल्ह्यासह राज्यच लक्ष लागून राहिलं आहे.
मंडलिक यांचं सूचक मौन
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेऊन मंडलिक यांनी शिंदे गटात सामील होण्याचा आग्रह धरला. या मेळाव्याला मंडलिक समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्यामुळे मंडलिक आता शिंदे गटात जाणार असल्याची दिवसभरापासून चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असली तरी मंडलिक यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या चर्चेचं खंडनही केलं नाही आणि त्याला दुजोराही दिला नाही. मंडलिक यांनी सूचक मौन पाळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मंडलिकांनी शिंदे गटात का जावे?
मंडलिक यांनी शिंदे गटात का जावं? याची कारणमीमांसाही या बैठकीत करण्यात आली. निवडणुकीला अडीच वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे सत्तेसोबत राहून जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी शिंदेंसोबत गेलं पाहिजे. कोरोना काळात निधी मिळाला नाही. त्यामुळे आता जास्तीत जास्त निधी मिळवून मतदारसंघाची कामे करण्यासाठी शिंदे गटासोबत गेलं पाहिजे, असं या समर्थकांचं म्हणणं आहे. लोकसभा मतदारसंघातील एक आमदार आणि दोन माजी आमदार शिंदेंसोबत राहणार आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचं नुकसान होऊ शकतं, शिवाय भाजपने प्रबळ उमेदवार धनंजय महाडिक राज्यसभेत पाठवला आहे. याचा अर्थ भाजप कोल्हापूर सर करण्याच्या तयारीत असल्याने कोणताही दगाफटका नको म्हणून मंडलिक यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा आग्रह होत आहे.