Rahul Shewale : गद्दार कोण? याचं उत्तर वरळी विधानसभेतील मतदारच देतील; राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला
Rahul Shewale : विनायक राऊत यांचा दावा चुकीचा आहे. आम्ही आणि लोकसभा अध्यक्षांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. गटनेता म्हणून माझी निवड केली आहे. ती वैध आहे. विनायक राऊत यांच्यावर सगळे खासदार नाराज होते.
नवी दिल्ली: शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांनी थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्यावर हल्ला चढवला आहे. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून निवडून आले. त्या वरळी मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे. युतीचा उमेदवार म्हणूनच त्यांना वरळीच्या मतदारांनी निवडून दिलं आहे. आशीर्वाद दिला. पण त्यांची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं ही गद्दाराची व्याख्या होऊ शकते का? हे तपासून पाहावं लागेल असं सांगतानाच गद्दार कोण याचे उत्तर वरळी विधानसभेतील मतदार येत्या निवडणुकीत देतील, असा इशारा राहुल शेवाळे यानी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. त्यामुळे त्यावर आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेचे (shivsena) नेते काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच लोकसभा गटनेतेपदाचं पत्रं 18 जुलै रोजीच लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं, असा दावाही त्यांनी केला.
लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात पत्र देण्याची कायदेशीर पूर्तता आम्ही 18 तारखेला केली. 19 जुलै रोजी परिपत्रक निघालं. चिराग पासवान प्रकरणातही तेच झालं. त्यावेळी चिराग पासवान यांच्या काकांना गटनेता म्हणून स्वीकृत करण्यात आलं. तसा कोर्टाचा निकाल आला आहे. त्यामुळे विनायक राऊत बोलतात त्यात तथ्य नाही. सर्व गोष्टीची कायदेशीर पूर्तता झाली आहे. या गोष्टींचा कोर्टात टिकाव लागणार नाही. अर्जाचं सबमिशन 18 तारखेचं आहे. तारखेचा वाद नाही. लोकसभा अध्यक्षांनी सर्व गोष्टीची पूर्तता केली आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.
युती म्हणूनच लोकसभा लढणार
2014 आणि 2019मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली. मोदींच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवला. बाळासाहेबांच्या विचारांना कौल दिला. आम्हाला युती म्हणून मतदारांनी दोनदा निवडून दिलं. आम्ही आधीच्या दोन निवडणुकीत जे केलं तेच 2024 च्या निवडणुकीत करणार आहोत. युती म्हणूनच लोकांकडे आशीर्वाद मागायला जाणार आहोत. 2014 आणि 2019मधील निवडणुकीपेक्षा यावेळी आम्हाला जास्त मते मिळतील, असा दावाही त्यांनी केला.
राऊतांवर नाराजी होती
विनायक राऊत यांचा दावा चुकीचा आहे. आम्ही आणि लोकसभा अध्यक्षांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. गटनेता म्हणून माझी निवड केली आहे. ती वैध आहे. विनायक राऊत यांच्यावर सगळे खासदार नाराज होते. हिंदुत्वाबाबत, विकासाबाबत मुद्दे मांडताना त्यांनी आम्हा खासदारांना बोलायची संधी दिली नाही. राऊत इतर खासदाराना प्रश्न मांडायला देत नव्हते. त्यामुळं हा राग व्यक्त केला गेला. म्हणूनच आम्ही गटनेता बदलला, असा दावाही त्यांनी केला.
भाजपलाच पाठिंबा
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार? असा सवाल केला असता आम्ही भाजपच्या उमदेवारालाच पाठिंबा देणार आहोत. संजय राऊत यांनी घेतलेली भूमिका वैयक्तिक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.