‘मातोश्री’च्या अंगणातील तिढा सुटेना, उद्धव ठाकरेंच्या डोक्याला दोन जागांचा ताप!
शिवसेनेसाठी मुंबईतील दोन जागा चांगल्याच हॉट सीट (Shiv sena seats conflict ) बनल्या आहेत. या दोन जागांचा तिढा काही केल्या सुटेना झाला आहे.
मुंबई : शिवसेनेसाठी मुंबईतील दोन जागा चांगल्याच हॉट सीट (Shiv sena seats conflict ) बनल्या आहेत. या दोन जागांचा तिढा काही केल्या सुटेना झाला आहे. भांडुप (पश्चिम) आणि वांद्रे (पूर्व) खेरवाडी इथे (Shiv sena seats conflict ) अजूनही उमेदवार ठरला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अद्याप निर्णय राखून ठेवला आहे.
भांडुप (पश्चिम) मध्ये विद्यमान आमदार अशोक पाटील आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्यात तर वांद्रे पूर्व खेरवाडी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तृप्ती सावंत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यात उमेदवारी मिळवण्यावरुन चुरस आहे.
आज रात्री उशिरा उद्धव ठाकरे दोनही मतदारसंघात उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उमेदवारी न मिळणाऱ्या इच्छुकाला बंडखोरी करण्याची संधी मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी निर्णय राखून ठेवला आहे.
कारण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी असलेल्या स्पर्धेत शिवसेनेला प्रत्येक जागा जिंकणं महत्वाचे आहे. त्यामुळे बंडखोरीचा धोका पत्करून जागा गमावण्याची शिवसेना नेतृत्वाची मनःस्थिती नाही.
महापौर विधानसभेसाठी इच्छुक
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी इच्छा महाडेश्वर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे.
सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघाचं नेतृत्त्व शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे तृप्ती सावंत यांचे पती प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडून तृप्ती सावंत तर काँग्रेसकडून नारायण राणे मैदानात होते. त्यावेळी नारायण राणे यांनी तृप्ती सावंत यांना फाईट दिली होती. मात्र तृप्ती सावंत यांनीच बाजी मारत तब्बल 19 हजार मतांनी राणेंवर विजय मिळवला होता.
ज्या मतदारसंघात नारायण राणे हरले, त्याच वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानातून उतरण्याची तयारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.
विश्वनाथ महाडेश्वर हे सध्या देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईचं महापौरपद भूषवत आहेत. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 84 जागा मिळवल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झाली.
‘मातोश्री’वर दोन इच्छुकांचा तळ
मागील 3 दिवसांपासून आमदार अशोक पाटील आणि रमेश कोरगावकर मातोश्रीवर थांबून आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर कोणताही निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी भांडुप पश्चिम मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय प्रलंबित ठेवल्याचंच सध्या चित्र आहे. असं असलं तरी दोन्ही इच्छुकांनी हार मानलेली नाही. एबी फॉर्म मिळावा म्हणून दोघेही अगदी संयमाने ‘मातोश्री’वर तळ ठोकून आहेत. त्यामुळे ‘मातोश्री’ या दोघांच्या संयमाची कसोटी पाहातेय की काय असाही प्रश्न आता विचारला जात आहे.
संबंधित बातम्या
‘मातोश्री’वर या दोन इच्छुकांच्या संयमाची कसोटी
शिवसेनेकडून या सात जागांवर वेट अँड वॉच, इच्छुक एबी फॉर्मसाठी ‘मातोश्री’वर
नारायण राणेंचा जिथे पराभव झाला, तिथून मुंबईचे महापौर विधानसभा लढणार?