विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील!! राजकीय चिता पेटवत राहील; ठाकरे गटाचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल
शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे.
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना (shivsena) साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. आम्ही समोरून वार करणारे आहोत, पण शत्रूने वार वर्मी बसण्याआधीच रणातून पळ काढला. अशा पळपुट्यांनी विजयी मशालीवर उगाच गुळण्या टाकण्याचे प्रयत्न करू नयेत. विजयाची ही मशाल (mashaal) अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील!! राजकीय चिता पेटवत राहील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला, असा हल्ला शिवसेनेने चढवला आहे.
आमची मनापासून इच्छा होती, भाजप व त्यांच्या मिंधे गटाचे उमेदवार या निवडणुकीत उतरायलाच हवे होते. म्हणजे मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला लागला असता. अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ऐक्य राखले, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
या निवडणुकीत हृदयात धनुष्यबाण आणि हाती मशाल असे चित्र दिसले. दुसरीकडे भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले, अशी टीका करण्यात आली आहे.
या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होता. पण भाजप किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर जनता अधिक जोमाने व त्वेषाने मतदान केंद्रावर पोहोचली असती. मतदानाचा आकडा 60 टक्क्यांवर गेला असता व मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते. अर्थात उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी आहे, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
‘मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,’ असे गमतीचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले. पेच व कारस्थाने करणाऱ्यांना सोयीनुसार ईश्वर आठवतो हेच खरे! पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही, असा हल्लाबोल करण्यात आला आहे.
शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.