जमावबंदी लावली, पोलिसांनी अडवलं, तरीही पुण्यात जाऊन संजय राऊतांनी नेमकं भाषण काय केलं?
"अनेक दिवसांपासून चाललं होतं की भेटायचं आहे. पण मला वेळ मिळत नव्हता कारण मला तुरुंगात टाकलं होतं. मला तुरुंगात का टाकलं? कारण मी काही केलं नव्हतं. मी माझ्या एका भावाकडून 50 लाख रुपये कुटुंबासाठी घेतले होते. ते पैसे मी परत केले. पण ई़डी आली", असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यानंतर ते आज साखर कारखान्याच्या भेटीसाठी गेले. पण त्यांना पोलिसांकडून तीनवेळा अडविण्यात आलं. या घडामोडींनंतर संजय राऊत यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. “शिट्ट्या वाजवू नका, कलम 144 लागू आहे. कलम 144 मध्ये शिट्ट्या वाजवायला बंदी असते. माझ्यासमोर सर्व भीमा पाटस साखर कारखान्याचे खरे मालक बसले आहेत. आपणच भीमा पाटस कारखान्याचे बाप आहोत. कुणी स्वत:ला बाप मानत असेल तर तो खोटा बाप आहे”, असा घणाघात राऊतांनी यावेळी केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडून आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी सर्वजण आले. मोदी फक्त भ्रष्टाचारांच्या प्रचाराला जातात. जो भ्रष्टाचार करत नाही त्याला भाजपात स्थानच नाही. भ्रष्टाचार सुद्धा लहान नाही तर कोटींमध्ये. कोटीच्या खाली नाही. त्यांना लाख समजत नाही. 50 खोके, 100 खोके आणि एकदम ओके”, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
“अनेक दिवसांपासून चाललं होतं की भेटायचं आहे. पण मला वेळ मिळत नव्हता कारण मला तुरुंगात टाकलं होतं. मला तुरुंगात का टाकलं? कारण मी काही केलं नव्हतं. मी माझ्या एका भावाकडून 50 लाख रुपये कुटुंबासाठी घेतले होते. ते पैसे मी परत केले. पण ई़डी आली. हा सरकारमध्ये अडथळा ठरेल. घेऊन गेले. मी त्यांचा पाया पडलो नाही की, मला घेऊन जाऊ नका. मी भाजपात प्रवेश करतो. मला सोडा. मला तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये टाका. मला स्वच्छ, पवित्र करा. मी म्हटलं, चला किती दिवस ठेवणार आहात? मला तुरुंगाची भिंत अडवू शकली नाही. तर कलम 144 कलम काय अडवणार?”, असा सवाल संजय राऊतांनी केला.
“साखर कारखान्याला 144 कलम? आम्ही सगळे संस्थापक मधुकरराव शितोडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आपण या कार्यक्रमाला येऊ, असं ठरलं होतं. पण त्याची एवढी भीती? दरवाजे बंद. आम्हाला 10 किमी आधी अडवलं. कलम 144 लागू आहे. कशासाठी? दंगल घडवणार का? आम्ही सांगून दंगल करु. पण कारखाना शेतकऱ्यांचा आहे. अडवलं, अडवायचा प्रयत्न केला. पण आम्ही आत गेलो. संस्थापकांना हार घातला आणि परत आलो. कारखाना तुमचा बाप नाही. बाप समोर बसलाय”, असं राऊत म्हणाले.
“विरोधी पक्षाचे आहेत म्हणून जेलमध्ये टाकता. पुढच्यावेळी किरीट सोमय्याला कारखान्यावर घेऊन येणार. आला नाही तर कॉलर पकडून घेऊन येणार. तुम्ही जर मिस्टर कुल आहात तर मी मिस्टर हॉट आहे. कारखाना घ्यायला महाराष्ट्रात कुणी नाही का? कर्नाटकमध्ये का गेलात? देवेंद्र फडणवीस आणि भाजपची लोकं भष्ट्राचाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.