साहेब मला माफ करा, शिवसैनिकाने शिवाजी पार्कवर का लावले बॅनर?
काम सुरु करण्याआधीच माझ्याकडे टक्केवारीची मागणी केली. मात्र सदर काम हे अधिकृत आहे. यामुळे अधिकाऱ्यांना मी टक्केवारी देऊ शकलो नाही.शेवटी काम सुरू होण्याआधीच थांबवलं'
मुंबई : राज्यात बॅनरबाजी विविध पक्ष आणि संघटनांकडून सातत्याने केली जाते. लोकांचे लक्ष वेधणारी किंवा राजकीय विरोधकांना लक्ष करुन बॅनर लावले जातात. आता एका शिवसैनिकाने लावलेल्या बॅनरची चर्चा सुरु झाली आहे. या शिवसैनिकाने चक्क बाळासाहेब ठाकरे यांना संबोधून बॅनर लावला आहे. त्यात त्याने साहेब मला माफ करा, मी क्षमस्व आहे, असे हेडींग देऊन बॅनर लावलंय.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिक राजेश चिंदरकर यांनी बॅनर लावलं आहे. साहेब मला माफ करा, आशा अशयाचे मोठे बॅनर लावलं आहे. हे बॅनर मुंबई महापालिकेच्या विरोधात लावलं आहे. त्यात मुंबई मनपाच्या कारभार टक्केवारीवर कसा सुरु आहे, ते दिले आहे.
काय आहे विषय : शिवसैनिक राजेश चिंदरकर यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त चाफ्याच्या झाडांचे उद्यान सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी २०१३ पासून प्रयत्न सुरु केले होते. त्या प्रयत्नांना २०१९ मध्ये यश आले. परंतु उद्यान मंजूर झाल्यानंतर आपल्याकडे अधिकाऱ्यांनी टक्केवारी मागितली म्हणून चाफ्याच्या झाडांचे उद्यान करु शकले नाही, असा आरोप या केला आहे. हा आरोप असणारा बॅनर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ लावला आहे.
बॅनरमध्ये नेमकं काय म्हटलं? :
‘साहेब मी आपल्या अशीर्वादाने राजकारणामध्ये आलो. एक शिवसैनिक म्हणून मी राजकीय वाटचाल आपल्या आशीर्वादामुळे यशस्वीरित्या सुरु केली आहे. आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे शिलालेख तसेच आपल्याला आवडणाऱ्या चाफ्यांच्या फुलांचे उद्यान निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यासाठी २०१३ पासून मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार केला. त्याला यश आले आणि शेवटी २०१९ साली मला उद्यानाची परवानगी मिळाली. परंतु काम सुरु करण्याआधीच माझ्याकडे टक्केवारीची मागणी केली. मात्र सदर काम हे अधिकृत आहे. यामुळे अधिकाऱ्यांना मी टक्केवारी देऊ शकलो नाही. शेवटी काम सुरू होण्याआधीच थांबवलं’
शिवसेनेची होती सत्ता : मुंबई मनपावर शिवसेनेची सत्ता होती. २०१९ मध्ये उद्यान मंजूर झाले तेव्हा प्रशासक नव्हते. शिवसेनेचा महापौर असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त सुरु होणाऱ्या उद्यानासाठी कोणत्या अधिकाऱ्याने टक्केवारी मागितली, याची चर्चा आता सुरु झालीय.