मी इथे फक्त या खटल्यासाठी उभा नाही, तर घटनेच्या संरक्षणासाठी… सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांची भावनिक टिप्पणी
युक्तिवाद संपवण्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर बोट ठेवलं. आयोगाने शिवसेना पक्षासंबंधी निर्णय घेताना जी कागदपत्र ग्राह्य धरण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा (Maharashtra political crisis) खटला हा देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अवघ्या देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज एक भावनिक वक्तव्य केलंय. या खटल्यात मी हरेन किंवा जिंकेन माहिती नाही. मात्र इथे उभा आहे तो राज्य घटनेच्या संरक्षणासाठी, असं कपिल सिब्बल म्हणाले. सुप्रीम कोर्टात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे खटल्यावर युक्तिवाद सुरु आहेत. कोर्टाने सर्वात आधी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना युक्तिवाद करायला सांगितलं.
सिब्बल यांनी सलग तीन दिवस युक्तिवाद केला. त्यानंतर आज ठाकरे गटाचेच वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली. आज गुरुवारी झालेल्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार तसेच बहुमत चाचणीतील आकडेवारीवरून जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर युक्तिवाद संपवताना कपिल सिब्बल यांनी ही भावनिक टिप्पणी केली.
कपिल सिब्बल काय म्हणाले?
युक्तिवाद संपवताना कपिल सिब्बल म्हणाले, मी इथे या खटल्यासाठी उभा आहे. हरेन किंवा जिंकेन माहिती नाही. मात्र घटनात्मक सार्वभौमत्त्व हे आमच्या हृदयाशी अगदी जवळचे आहे. त्याच्या संरक्षणासाठी मी इथे आहे. घटनात्मक प्रक्रियेचा बचाव होईल, याची सुनिश्चितता करण्यासाठी मी इथे आहे. मात्र कोर्टाने सदर घटनाक्रमाला परवानगी दिली तर १९५० पासून आपण टिकवून ठेवलेल्या लोकशाहीचा अंत होईल…
घटनात्मक प्रक्रियेत अशा प्रकारे हस्तक्षेप झाला तर लोकशाही आणखी कोणत्या मार्गाला पोहोचेल हे सांगता येत नाही.
‘आयोगाने असा पक्षपात केला…’
युक्तिवाद संपवण्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर बोट ठेवलं. आयोगाने शिवसेना पक्षासंबंधी निर्णय घेताना जी कागदपत्र ग्राह्य धरण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिंदे गटाच्या वतीने १९ जुलै रोजी याचिका दाखल केली. मात्र त्यात २७ जुलैच्या बैठकांचे मुद्दे पुराव्यादाखल देण्यात आले आहेत. हे दोन्ही डॉक्युमेंट आयोगाकडे आहेत. १९ तारखेलाच त्यांना २७ तारखेच्या मीटिंगमध्ये काय होतंय, हे कसं माहिती असेल, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.
त्यामुळेच निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केला, हे सिद्ध होतं आणि अंतिम निर्णय त्यांच्या बाजूने घेतला गेला, असा दावा सिब्बल यांनी केला.