सातारा आणि कोल्हापूरच्या राजांच्या भूमिकांचा अर्थ एकच, महाराष्ट्र जातीपातीच्या लढाईत फाटू नये : सामना
सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. (Shivsena Comment on MP Udayanraje and Sambhaji Raje)
मुंबई : सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट आणि शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी परपस्पर घेतलेल्या दोन भूमिकांबद्दल टोलेबाजी केली आहे. (Shivsena Comment on MP Udayanraje and Sambhaji Raje)
मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी ‘सातारकरां’पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी साफ सांगितले आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही ‘राजे’ आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे.
या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची नाही, तर एकमेकांच्या मांडीस मांडी लावून, खांद्यास खांदा भिडवून मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा गुंता सोडवण्याची आहे.
मोदींनी मनात आणलं तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड
भाजप नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन वळवायला हवे. सध्या मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे. पण ‘मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या’ असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.
कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्नी नक्की कोणाला ठोकायचे याचे उत्तर मिळायला हवे, ‘‘जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते’’ हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. (Shivsena Comment on MP Udayanraje and Sambhaji Raje)
संबंधित बातम्या :
उदयनराजेंना परत राजेशाही आणायची आहे काय?, हरिभाऊ राठोडांचा सवाल
गाडीच्या बोनेटवर चटणी भाकरीचा आस्वाद, संभाजीराजेंनी कार्यकर्त्याची शिदोरी सोडली