Eknath Shinde | ‘दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते तुमच्या सारख्या कावळ्यांना नाही’
Eknath Shinde | "तुम्ही काडी लावत जा, आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ. तुम्ही जाळण्याची भाषा करा आणि आम्ही महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू" अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला उत्तर दिलय.
सोलापूर, (सागर सुरवसे) | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खूप बोचरी टीका केली. ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला. “लंका त्यांचीच आहे, आम्ही हुनमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण, महाभारात वाचाव लागेल” असं संजय राऊत म्हणाले. “कोणाच काय जळतय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळतेय. तम्ही जिथे गेलाय, त्यांचीच लंका जळणार. “तुझी दाढी दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीला वाटेल, तेव्हा दाढी खेचून तुला बोलवतात. रावणाची लंका होती. महाराष्ट्रात पंचवटीला रामाच वास्तव्य होतं. तुझ्या दाढीला आग लावणार” असं संजय राऊत म्हणाले.
त्यावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. “दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्या सारख्या कावळ्यांना नाही. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे, महात्मा फुले, गुरुगोविंद सिंग, गुरुनानक तसेच नवनाथांनाही दाढी होती. तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.
तुम्ही काडी लावत जा, आणि आम्ही….
“तुम्ही काडी लावत जा, आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ. तुम्ही जाळण्याची भाषा करा आणि आम्ही महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू. इथून पुढे जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा त्यांनी संजय राऊत यांना दिला.