अनिल राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पवारांच्या नगरमधील फोडाफोडीला उत्तर मिळणार?
अहमदनगर/मुंबई : शिवसेनेचे अहमदनगरमधील माजी आमदार अनिल राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये बैठका घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना-भाजप कामाला लागली आहे. भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी […]
अहमदनगर/मुंबई : शिवसेनेचे अहमदनगरमधील माजी आमदार अनिल राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरमध्ये बैठका घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना-भाजप कामाला लागली आहे. भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादीचे नगरचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये जाऊन बैठका घेतल्या. शिवाय भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दोन पुतण्यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रचार केला. राष्ट्रवादीने नगरमध्ये केलेली फोडाफोडी आणि जिल्ह्यातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी अनिल राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तातडीने रवाना झाले.
अनिल राठोड हे सध्या शिवसेनेचे उपनेते असून ते सलग 25 वर्ष आमदार होते. नगरमध्ये शिवसेनेचे महापालिकेत सर्वाधिक 24 नगरसेवक आहेत. संपूर्ण नगर शहरासह जिल्ह्याची जबाबदारी अनिल राठोड यांच्याकडे आहे. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारासाठी दोन्हीही पक्ष कामाला लागले आहेत. तर सुजय विखेंच्या मतदारसंघनिहाय बैठका सुरु आहेत.
कर्डिलेंचे पुतणे राष्ट्रवादीत
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास आणि देवीदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीत प्रचार केलाय. भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी हा धक्का मानला जात आहे.
रोहिदास आणि देवीदास हे शिवाजी कर्डिले यांचे बंधू आप्पासाहेब कर्डिले यांचे चिरंजीव आहेत. तर देवीदास बाणेदार दूध संघाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या जनसंपर्काचा फायदा राष्ट्रवादीला होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिलेंचे जावई आहेत. त्यामुळे या नात्या-गोत्यांच्या राजकारणात नगरची लढत रंगतदार होणार आहे.
नगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची डोकेदुखी
नगरमध्ये काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुलासाठी विखे पाटलांनीही बैठका सुरु केल्याचं बोललं जातंय. विखे आणि पवार घराण्याचं वैर जुनं आहे. त्यामुळे स्वतः शरद पवारच नगरमध्ये बैठका घेत आहेत. विखे पाटील सध्या काँग्रेसमध्येच आहेत, पण नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.
नगरमध्ये विखे पाटलांचीच मदत होणार नसल्याने राष्ट्रवादीचीही अडचण आहे. शिवाय भाजपमधून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिलाय. दिलीप गांधींना डावलून सुजय विखेंना तिकीट दिल्यामुळे दिलीप गांधींचे कार्यकर्ते नाराज आहेत.