मुंबई : शिवसेनेचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गवर असल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत डॉ. कोल्हे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, डॉ. अमोल कोल्हे यांच्या सोबत शिवसेनेचे दोन माजी आमदार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कोण आहेत डॉ. अमोल कोल्हे?
शिक्षणाने डॉक्टर असलेले डॉ. अमोल कोल्हे हे मराठी सिनेमा, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील नामवंत अभिनेते आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांची मालिका खूप गाजली. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेतही काम केले. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि अदराच्या स्थानी असलेल्या दोन्ही राजांचे व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर नेमकेपणानं उभारण्याचे यशस्वी काम डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. कमी कालावधीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाली. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून त्यांची गणना होऊ लागली होती.