काल मोहिते पाटलांना आव्हान, आज शिरुरच्या आमदारांना इशारा, डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सेना आक्रमक
काल खेडमध्ये बोलताना राऊतांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आव्हान दिलं तर आज उपनेते मिर्लेकरांनी शिरुरच्या आमदारांना इशारा दिलाय. डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना सज्जड दम दिलाय.
![काल मोहिते पाटलांना आव्हान, आज शिरुरच्या आमदारांना इशारा, डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सेना आक्रमक काल मोहिते पाटलांना आव्हान, आज शिरुरच्या आमदारांना इशारा, डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सेना आक्रमक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/05185452/Shivsena-Leader-Ravindra-Mirlekar-Warning-NCP-MLA-Ashok-Pawar.jpg?w=1280)
शिरुर : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि उपनेते रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघ दोघा नेत्यांनी पिंजून काढलाय. खेड-जुन्नर या एकेकाळच्या सेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर शिरुर लोकसभेत कोल्हेंनी आढळरावांना खासदारकीचा चौकार मारु दिला नाही. शिवसेनेला हीच मोठी खंत आहे. कालपासून राऊत-मिर्लेकर आपल्या भाषणांत राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे देतायत. काल खेडमध्ये बोलताना राऊतांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना आव्हान दिलं तर आज उपनेते मिर्लेकरांनी शिरुरच्या आमदारांना इशारा दिलाय. डिवचू नका, नाहीतर सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना सज्जड दम दिलाय.
शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा गड… आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखलं. तसंच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी धुसफूस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेना नेते राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आक्रमक झाले आहेत तसंच राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे देत आहेत.
विनाकारण डिवचू नका, वाघानं झेप घेतली तर सोडणार नाही
काल आम्ही खेडच्या मोहिते पाटलांना आव्हानं देऊन आलोय. इथल्या शिरुरच्या आमदारांनाही सांगतोय विनाकारण डिवचू नका, वाघानं झेप घेतली तर सोडणार नाही, असा इशारा सेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी शिरुर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांना दिला.
वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु, राऊतांचा मोहिते पाटलांना इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर संजय राऊत यांनी खेडमध्ये बोलताना हल्ला चढवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, असा इशाराच संजय राऊत यांनी दिलाय.
शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास- राऊत
संजय राऊत यांनी काल जुन्नरमध्ये बोलताना उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवलं तसंच शिवसेना नेत्यांच्या मनातली बात खुलेआम बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आदेश देतानाच शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो, असं राऊत म्हणाले. एकप्रकारे त्यांनी खा. कोल्हे आणि आमदार अतुलशेठ बेनके यांचा पराभूत करण्याचा मनसुबा बोलून दाखवला.
(Shivsena Leader Ravindra Mirlekar Warning NCP MLA Ashok Pawar)
हे ही वाचा :
‘पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’, संजय राऊतांचा घणाघात