…मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर हवं, ‘मेरा बाप महा गद्दार’, शिवसेना नेत्याचा हल्लाबोल
खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या वक्तव्यावरुन एक मोठा वाद निर्माण झाला आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. प्रियंका चतुर्वेदी या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होत्या.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या वक्तव्यावरुन एक मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याला आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. अत्यंत बोचऱ्या शब्दांचा वापर करताना प्रसंगी व्यक्तीगत पातळीवरची टीका केली जात आहे. प्रियंका चतुर्वेदी या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होत्या. “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” असं त्या म्हणाल्या.
त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाचा उल्लेख केला. ‘दीवार’ सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या टीकेला उत्तर दिलय. त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.
‘त्यांनी माफी मागावी’
“ठाकरे गटाच्या महिला खासदाराने एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल खूप अभद्र टिप्पणी केली. माझे वडील गद्दार आहेत, हे श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलं आहे. असं असेल, तर मग आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहिल पाहिजे माझा बाप महा गद्दार आहे. कारण त्याच्या वडिलांनी भाजपासोबत युती तोडून गद्दारी केली” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेनेच्या महिला खासदाराने जे म्हटलं त्याबद्दल त्यांनी माफी मागावी’ असं संजय निरुपम म्हणाले.
‘…तर हे दुकान बंद करेन’
“मला काँग्रेससोबत जावं लागलं, तर हे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेब म्हणाले होते की, काँग्रेसचे लोक निंदक, नपुंसक, किन्नर आहेत. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी मोठा गद्दारी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कपाळावर माझे वडील मोठे गद्दार आहेत असे लिहावे” असं संजय निरुपम म्हणाले.
‘बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली’
“माझा पक्ष तुटला, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात. खरे तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली आहे. आणि हिंदुत्वाच्या वाटेवर परत येऊन भाजपशी युती केली” असं संजय निरुपम म्हणाले.