मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचा जातीचा दाखला खोटा, शिवसेना नेत्याचा आरोप
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला खोटा आणि बनावट असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. (Shivsena Leader Somesh Kshirsagar allegations on MLA Yashwant Mane).
सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला खोटा आणि बनावट असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे. बनावट आणि खोटी कागपत्र तयार करुन माने यांनी शासनाची आणि जनतेची फसवणूक केली आहे, असं सोमेश क्षीरसागर म्हणाले आहेत. याप्रकरणी त्यांनी यशवंत माने यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे (Shivsena Leader Somesh Kshirsagar allegations on MLA Yashwant Mane).
मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती गटातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले. तर शिवसेनेचे नेते सोमेश क्षिरसागर यांचे वडील नागनाथ क्षिरसागर यांनी यशवंत माने यांच्याविरोधात 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते.
“मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र, यशवंत माने हे या प्रवर्गात येत नाहीत”, असा दावा सोमेश क्षिरसागर यांनी केला आहे. “आमदार यशवंत माने यांनी बनावट कागदपत्र जमा करुन जातीचा दाखला मिळवला. हा एक प्रकारे अनुसूचित जातीच्या उमेदवारावर अन्याय आहे”, अशी भूमिका सोमेश क्षिरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे.
“यशवंत माने यांनी निवडणुकीसाठी जातीचं बनावट प्रमाणपत्र मिळवलं. माने हे हिंदू कैकाडी जातीचे आहेत. ही जात विदर्भात अनुसूचित जाती संवर्गात येते. मात्र, महाराष्ट्रात ही जात विमुक्त जाती संवर्गात येते”, असं सोमेश क्षिरसागर म्हणाले (Shivsena Leader Somesh Kshirsagar allegations on MLA Yashwant Mane).
“यशवंत माने हे पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील शेळगावचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी स्वतःचे दाखले बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावचे रहिवाशी असल्याचे सांगून जातीचे प्रमाणपत्र मिळवले”, असा आरोप सोमेश क्षिरसागर यांनी केला आहे.