बाळासाहेबांच्या त्या खोलीत अमित शाह, उद्धव ठाकरेंमध्ये काय झाले…संजय राऊत यांनी म्हटले
Sanjay Raut | बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. काय ते म्हणे मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये झाला. भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये झाला. काय ही लाचारी आहे.
गणेश थोरात, मुंबई, दि. 18 फेब्रुवारी 2024 | भाजप आणि शिवसेना युती 2014 मधील निवडणुकीत तुटली. त्यानंतर त्यांना प्रचंड धक्का बसला. आपण जिंकू शकत नाही, हे त्यांना समजले. मग भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शाह स्वतः मातोश्रीवर आले होते. ते मातोश्रीवर कशा करता आले होते? त्याचे उत्तर या महाशयांनी आम्हाला द्यावे. तसेच अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली, हे सांगावे, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.
मग मिस्टर अमित शाह मातोश्री का आले?
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेना अधिवेशात बोलताना अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, अमित शाह मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले होते? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विचारावा. त्यावेळेस ते मातोश्रीवर होते का? त्यावेळी मी मातोश्रीवर होतो. बंद दारा आड चर्चा झाली होती. परंतु मी चर्चेत नव्हतो. आता एकनाथ शिंदे आरोप करत आहेत. त्यांना तेव्हा काय स्थान होते. ते तेव्हा पक्षाचे नेते देखील नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आम्ही केले, अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर राऊत यांनी केली. मोदी शाह यांच्यासोबत शिंदे यांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात
हा माणूस पूर्ण पणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झाला आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अशी बेताल वक्तव्य ते करत आहेत. मोदी आणि अमित शहा बरोबर राहून राहून खोटे बोलण्याचे व्यसन त्यांना लागले आहे. ते खोटे बोलण्याचा गांजा मारतात आणि बोलतात. मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे त्यांना काहीही बोलण्याचे लायसन्स दिले गेलेले नाही. हे महाशय काल बोलत असताना अधिवेशातून लोकं उठून जात होते. त्यांचे व्हिडिओ आले समोर आले आहेत.
हॉटेल ब्लू सीमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पावर स्टेरिंग फिफ्टी-फिफ्टी आहे. आता त्यांच्या कानात काय गोळे बसलेत. त्यांच्या कानाला बुच बसलय आहे का? आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत. तुमच्यासारखे गांडू नाही, तुमच्यासारखे पळकुटे नाही. पळून जाणारे नाही. डरपोक नाही, असे राऊत यांनी म्हटले.
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. काय ते म्हणे मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये झाला. भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये झाला. काय ही लाचारी आहे. आज बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता. या लोकांच्या कशात जोर आहे तर कमरेत जोर आहे. दिल्लीतमध्ये जाऊन वाकतात.