पप्पू म्हणणाऱ्या ‘या’ नेत्याच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा आवाज घुमणार! शिवसेना आक्रमक!
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांना तगडं आव्हान देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचं दिसून येतंय.

दत्ता कनवटे, औरंगाबादः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पप्पू, दोन नंबरचा पप्पू, छोटा पप्पू या नावांनी ज्यांनी संबोधलं, ज्यांनी खिल्ली उडवली, त्याच नेत्याच्या बालेकिल्ल्यात आता शिवसेनेचा (Shivsena) मोठा मेळावा होणार आहे. राज्याचे कृषीमंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मतदारसंघात शिवसेनेने हा मेळावा आयोजित केला आहे.
7 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये मेळावा आयोजित केला आहे. आदित्य ठाकरे आता अब्दुल सत्तार यांच्या टीकेला कसं प्रत्युत्तर देतात, याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.
अब्दुल सत्तार यांच्यासह फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांच्या बालेकिल्ल्यातही शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोड तर 8 नोव्हेंबर रोजी पैठणमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबीय केवळ मातोश्रीवर मुक्काम ठोकून असतात या विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
तर एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांच्याही मतदारसंघात कार्यक्रम घेण्याची शिवसेनेची चाचपणी सुरु आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनापेक्षाही जास्त गर्दी जमवण्याचं शिवसेनेचं नियोजन आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आता सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना शह देण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांवर या शिवसंवाद यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकांचे निकाल, मतांची आकडेवारी, बंडखोरांची ताकद आदी गोष्टींची चाचपणी केली जात आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची चाचपणीदेखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंवाद यात्रेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
एकूणच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांना तगडं आव्हान देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचं दिसून येतंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. पण निवडणुकीच्या मैदानात शिंदे गटाला धूळ चारण्याची पूर्ण तयारी ठाकरे गटाने केली आहे.