Dada Bhuse: प्रवाहाविरुद्ध राजकारण, प्रस्थापितांना बसवलं घरी; वाचा दादा भुसेंची ‘राज’नीती
प्रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता, अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. मालेगावातील प्रस्थापितांना भुसे यांनी कायमचं घरी बसवलं. त्यामुळे त्यांची ही ओळख अधिकच गडद झाली.
राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार (Cabinet Expansion) अखेर आज (9 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता राजभवनावर झाला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांचा समावेश झाला. त्यात शिंदे गटातील दादा भुसे (Dada Bhuse) यांनीदेखील संधी मिळाली. प्रवाहाविरुद्धचं राजकारण करणारा नेता, अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता अशी दादा भुसे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. मालेगावातील प्रस्थापितांना भुसे यांनी कायमचं घरी बसवलं. त्यामुळे त्यांची ही ओळख अधिकच गडद झाली. नेमकं काय आहे हे प्रकरणं? दादा भुसे हे कोण आहेत? काय आहे त्यांचं राजकारण (Politics), याबद्दल जाणून घेऊयात..
कोण आहेत दादा भुसे?
दादाजी दगडू भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी नाशिकच्या मालेगावमध्ये झाला. त्यांनी डीसीए पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. मालेगाव बाह्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.
साधा शिवसैनिक
मालेगाव हा काँग्रेस आणि समाजवाद्यांचा गड म्हणून ओळखला जातो. काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या वर्चस्ववादी राजकारणात कोणीही टिकून राहण्याची शक्यता नसताना आणि जिल्ह्यातील तरुणांचा कल या दोन्ही पक्षांकडे असतानाच भुसे यांनी मात्र शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपलं राजकारण सुरू केलं. त्यात त्यांना यशही आलं. सुरुवातीच्या काळात गावोगावी त्यांनी शिवसेनेच्या शाखा उभ्या केल्या. साधा शिवसैनिक ते तालुकाप्रमुख अशी मजलही त्यांनी मारली. भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले आहेत. घरात दुरून दुरूनही राजकीय वारसा नव्हता. तरीही त्यांनी आपल्या हिंमतीवर राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
हिरे घराण्याला आव्हान
मालेगावात सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे यांचं वर्चस्व होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली. मालेगावमधील हिरे घराण्याच्या या वर्चस्वला भुसे यांनी हादरे दिले. गेली वीस वर्ष पक्षाचे काम करत असताना सुरुवातीला भुसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. नंतर मात्र, त्यांनी या पराभवावर मात केली. 2004 मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर भुसे यांनी मागे वळून पाहिले नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चारवेळा दणदणती विजय मिळवला. विशेष म्हणजे गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते, तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या भुसेंना आता शिंदे आणि भाजप सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळालं आहे.
राजकारणी, समाजकारणी कुटुंब
भुसे हे राजकारणात आहेतच. पण त्यांची पत्नी अनिता या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांचे चिरंजीव अजिंक्य आणि अविष्कार हे युवासेनेत सक्रिय आहेत. अविष्कार तर युवा सेनेचे राज्य संघटक आहेत. त्यामुळे राजकारण आणि समाजकारणाला वाहून घेतलेलं कुटुंब म्हणूनही भुसे यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं.
वेषांतर करून साठेबाजी उघड
पूर्वी राजे लोक राज्याचा हालहवाल जाणून घेण्यासाठी राज्यात वेषांतर करून फिरायचे आणि गुन्हेगारांना शिक्षा द्यायचे. मंत्री झाल्यानंतर भुसे यांनीही हाच कित्ता गिरवला होता. खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना खत दिलं जात नसल्याचा खत विक्रेत्यांनी युरियाची साठेबाजी केल्याच्या तक्रारी भुसे यांच्याकडे आल्या होत्या. तसेच एका खतावर दुसरे खत किंवा बियाणे घेण्याची सक्ती करण्यात येते. युरियाची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारीही त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी थेट औरंगाबादमध्ये छापा मारला. चेहऱ्यावर मोठा बागायतदार रुमाल बांधला. एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून ते जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील नवभारत फर्टिलायझर्स या दुकानात पोहोचले आणि त्यांनी दुकानदाराकडे युरिया खताची मागणी केली. पण विक्रेत्याने खत नसल्याचे सांगितले. ‘दहा नसतील तर, किमान पाच बॅग तरी युरिया द्या,’ अशी विनंती त्यांनी केली. तब्बल अर्धा तास ते खताची मागणी करत होते. मात्र, खत विक्रेता खत देण्यास नकार देत होता. त्यावेळी त्यांनी,’फलकावर खताचा साठा असल्याचे का लिहिलेले आहे, साठा रजिस्ट्रर कुठे आहे,’ अशी विचारणा केली. त्यावर विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुकानात अनागोंदी आहे, हे लक्षात आल्यावर दादा भुसेंनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि दुकानातून युरिया खताचा साठा जप्त करून दुकानदारावर कारवाई केली.