विदर्भातील शिवसेनेच्या सामर्थ्यवान नेत्या, वन वुमेन आर्मी, जाणून घ्या कोण आहेत भावना गवळी?
Bhavna Gawali | लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवून उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले.
मुंबई: विदर्भातील शिवसेनेच्या ताकदवान नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचा समावेश होतो. 2019 मध्ये सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून भावना गवळी (Bhavna Gawli) यांनी आपला राजकीय दबदबा सिद्ध केला होता. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भावना गवळी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील राजकारणात समर्थपणे पाय रोवून उभ्या आहेत.
कोण आहेत भावना गवळी?
भावना गवळी यांचा जन्म 23 मे 1974 रोजी वाशिम येथे झाला. माझी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. त्या पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिकराव गवळी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतरही भावना गवळी यांनी त्यांच्या राजकारणाचा वसा समर्थपणे पुढे नेला.
…तेव्हा आई सोडून जाईल अशी भीती वाटली होती
भावना यांना बास्केट बॉल, टेनिस आणि स्विमींग या खेळांची आवड आहे. मात्र, राजकारणात आल्यापासून या सर्वांना वेळ देता येत नाही, अशी खंत त्यांनी मध्यंतरी व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांच्या गराड्यात आणि लोकांच्या प्रश्नात आपले खासगी जीवन कधीच संपुष्टात आल्याचे त्यांनी म्हटले होते.
यासंदर्भात एक किस्सा सांगतान भावना गवळी म्हणाल्या होत्या की, लोकसभा निवडणुकीच्या काळात आईची मोठी शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा आई आपल्याला एकटं सोडून जाईल का ही भिती मनात दाटून आली परंतु, तशाही परिस्थितीत मला आईला वेळ देता आला नसल्याची खंत त्यांच्या मनाला अद्यापही आहे.
भावना गवळी यांचा राजकीय प्रवास
लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. यानंतर 2004, 2009, 2014 आणि आता 2019 असा सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकात विजय मिळवून उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या 20 ते 22 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
किरीट सोमय्यांना थेट आव्हान
महाविकासआघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढण्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रकरणात भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विदर्भातील रस्तेबांधणीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे काही नेते अडथळे आणत असल्याचे म्हटले होते. यावरुन किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना भावना गवळी यांनी म्हटले होते की, किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. मात्र, त्यांनी माझ्यासमोर येऊन कोणता भ्रष्टाचार झाला आहे, हे सांगावे. तेव्हा मी त्यांना उत्तर देईन, असे भावना गवळी यांनी म्हटले होते.
तसेच आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटणार असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले होते. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. परंतु, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून हे गैरसमज दूर करणार असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते.