CM Eknath Shinde : शिवसेनेच्या 12 खासदारांच्या फुटीवर शिक्कामोर्तब, एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत घेतलं एका एका खासदाराचं नाव
12 खासदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी 12 खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनीच शिक्कामोर्तब केलंय.
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर आता केंद्रातही शिवसेनेला (Shivsena) मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे 12 खासदार आज शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या 12 खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेत आपला वेगळा गट स्थापन करण्यास मान्यता देण्याची मागणी केलीय. तसंच आपल्या गटाला बसण्यासाठी वेगळी जागा देण्याची मागणीही या खासदारांकडून करण्यात आलीय. या खासदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी 12 खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत खुद्द एकनाथ शिंदे यांनीच शिक्कामोर्तब केलंय.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते, मुख्यप्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे. सर्व बारा खासदार आहेत. त्यांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्रं दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचं पत्रं दिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
’12 खासदारांचं मनापासून स्वागत करतो’
दिल्लीत येण्याचं हे एक कारण होतं. ओबीसी आरक्षणावर उद्या सुनावणी आहे. त्यासाठी आलो आहे. वकिलांची भेट घेतली. सर्वात आधी 12 खासदारांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका आहे, जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन केलं, असं शिंदे म्हणाले.
‘राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही’
मी आमची भूमिका वारंवार सांगितली आहे. आमच्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलंच आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनेही त्याचं समर्थन मोठ्या प्रमाणावर केलं आहे. निवडणूकपूर्व आमची युती होती. महिन्याभरात आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवं होतं. ते आता केलं. लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलं. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. आम्ही सरकार स्थापन केल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. इंधनापासून शेतीपर्यंतचे अनेक निर्णय घेतले. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे कामही सुरू केलंय. केंद्र सरकारचं पाठबळ मिळत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही, असं केंद्राने सांगितल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले.