राष्ट्रवादीला पायाखाली घालायची भाषा, ‘अरे’ला ‘कारे’ने प्रत्युत्तर; कोण आहेत खासदार संजय जाधव?
Sanjay Jadhav | संजय जाधव हे कोणतीही तमा न बाळगता बेधडक आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जातात. आतादेखील संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला बाजूला सारून 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे
मुंबई: परभणीच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती रोखण्यासाठी पुढाकार घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडल्यापासून शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. हा वाद इतक्यावरच थांबला नसून यावरुन संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलीच आगपाखड केली होती. परभणी जिल्ह्यात संजय जाधव आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये असलेले विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रूत आहे. त्यामुळेच अधुनमधून परभणीत संजय जाधव विरुद्ध असा ‘सामना’ही रंगत असतो.
संजय जाधव हे कोणतीही तमा न बाळगता बेधडक आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जातात. आतादेखील संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला बाजूला सारून ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी संजय जाधवांसारखा ‘निखारा’ कसा हाताळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कोण आहेत संजय जाधव?
संजय जाधव यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी परभणीत झाला. शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात नगरपरिषेदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कट्टर शिवसैनिक असलेले संजय जाधव टीका करताना कोणतीही भीडभाड बाळगत नाहीत. कडक व शिस्तप्रिय खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. दरवर्षी ते आषाढी वारीत पायी पंढरपूरला जातात.
संजय जाधव यांचा राजकीय प्रवास
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी जिल्ह्यात संजय जाधव यांचा चांगलाच दबदबा आहे. नगरपरिषेदपासून राजकारणाला सुरुवात करणाऱ्या संजय जाधव दोनवेळा परभणी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. 2014मध्ये त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 मते मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांना धूळ चारली होती.
न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची?
परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याच्या रागातून गेल्यावर्षी संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसची खास ताकद नसतानाही जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली.
ही बाब माझ्या मनाला फारच खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा मला मुळीच नैतिक अधिकार नाही. शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तेव्हा कार्यकर्त्याला पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची? शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल?, असा संतप्त सवाल उपस्थित करत संजय जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, त्यावेळी पक्षश्रेष्ठी आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना संजय जाधव यांची समजूत काढण्यात यश आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती.
‘तर राष्ट्रवादीलाही आम्ही पायाखाली घालू’
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या नाट्यावरून शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असा इशारा संजय जाधव यांनी दिला होता.
खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे. माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. मी फक्त आंचल गोयल प्रकरणी शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीने रान उठवले. तुम्हाला सगळे जमते. आमचे तेवढे उघडे करता. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला होता.
संबंधित बातम्या:
VIDEO| ‘कुणाला राग नको, लोभ नको’, परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेची आयडियाची कल्पना