रविंद्र वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर संजय राऊतांचे फडणवीसांना चॅलेंज, म्हणाले “आता अधिकाऱ्यांवर…”
वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरुन पळून गेले. याच खटल्यांमुळे ते गेले आणि आता त्यांना क्लीन चीट दिली, असेही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut Challenge Devendra Fadnavis : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. आता यावर खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. EOW च्या प्रमुखांवर खटला दाखल करायला हवा. त्यांनी वायकरांना मनस्ताप दिला. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले.
दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी
आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे. हे सरकार महाराष्ट्रातील असो किंवा दिल्लीतील ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतात. त्यानंतर आमची ताकद किती वाढली हे दाखवतात. या सर्वांवर भ्रष्टाचारासंदर्भातील कारवाई करा, ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. त्यात वायकरही आहेत. वायकर हे घाबरुन पळून गेले. वायकर हे ईडी आणि सीबीआयला घाबरुन पळून गेले. याच खटल्यांमुळे ते गेले आणि आता त्यांना क्लीन चीट दिली. मोदी आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये दुसरं काय होऊ शकतं? हे कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या लोकांवर खोटे खटले खोटे गुन्हे दाखल केले. त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात बोलवलं. हे तुम्ही मान्य करा, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, हे भाजपने मान्य करायला हवं
आमच्यासह सर्वांवर तुम्ही अशाप्रकारचे खोटे खटले, गुन्हे दाखल करुन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोकं दबावाला बळी पडले नाहीत. पण ज्यांच काळीज उंदराचं आहे, असे अनेक लोक पळून गेले. अजित पवार, एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत असणारे आमदार या सर्वांना कारवाईची भीती होती. त्यामुळे भाजपने आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते, हे मान्य करायला हवं. भीती निर्माण करण्यासाठी हे केलं गेलं. मग आता का मागे घेतले. माझ्यावरचे, नवाब मलिक यांच्यावर असलेले गुन्हे मागे घ्या. प्रफुल्ल पटेल यांच्यावर असलेले गुन्हे मागे घेतले. १५० कोटींची मालमत्ता तुम्ही रिलीज केली. मग आमच्याही मध्यमवर्गींच्या मालमत्ता तुम्ही जप्त केलेल्या आहेत. आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही किंवा तुमच्या पक्षात येत नाही, म्हणून तुम्ही आमच्यावर खटले दाखल केले. याचा विचार करायला हवा, असेही संजय राऊत म्हणाले.
ते खटलेही मागे घ्या
सोमय्या हा फडतूस माणूस आहे. त्याने आता वायकरांवरील खटला मागे घेतला त्यावर बोलावं. जर हे कोणी सत्यवचनी असतील तर हे भ्रष्टाचारी वॉशिंग मशीनमध्ये घेऊन धुवायचं काम चालू आहे, त्यावर बोलावं. वायकरांसारख्या लोकांवरील खटले कसे मागे घेतले जातात, त्यावर बोलावं. जर तुम्ही खरे असाल, तुमचं रक्त शुद्ध असेल तर बोला. तुम्ही बनावट असाल तर तुम्ही बोलणार नाहीत. अशाप्रकारचे अनेक गुन्हे त्यांनी राजकीय गैरसमजातूनच दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागले. महापालिकेतील कोविड, खिचडी असे अनेक खटले राजकीय गैरसमजातूनच निर्माण झाले आहेत. मग तेही मागे घ्या. आर्थिक गुन्हे शाखा (EOW) च्या प्रमुखांवर खटला दाखल करायला हवा. त्यांनी वायकरांना मनस्ताप दिला. आमच्या पक्षातून बाहेर जायला भाग पाडलं. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, माझं फडणवीसांना आवाहन आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.