मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केलीय. नारायण राणे म्हणजे लाचारीचा महामेरु असं म्हणत त्यांनी राणेंवर पाय चाटून इथवर पोहचल्याचा आरोप केला. यावेळी राऊत यांनी नारायण राणे पनौती असल्याची टीका करत भाजपने त्यांना वेळीच जागा दाखवून द्यावी, असा सल्लाही भाजपला दिला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चांगलाच चढलाय.
विनायक राऊत म्हणाले, “भाजपनं एक लक्षात ठेवावं की नारायण राणे म्हणजे पनौती आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांना स्विकारलं तो पक्ष अस्थंगत झालाय. हा नेता स्वतःच्या स्वार्थासाठी चाटुगिरी करुन इतरांचे पाय चाटतात. त्यांनी आजपर्यंत ज्यांनी उपकार केले त्याच्याशी बईमानी केलीय. स्वार्थासाठी त्यांनी इतरांचे पाय पकडले. ते नारायण राणे आपल्या पक्षाला लागलेली पनौती आहे हे आजपर्यंतच्या इतर पक्षांनी अनुभवलं आहे. भाजपलाही आगामी निवडणुकीत पनौती लावून घ्यायची नसेल तर नारायण राणेंना आत्ताच त्यांची जागा दाखवून द्या, असा माझा भाजपला सल्ला आहे.”
“नारायण राणे यांनी महाडमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलंय. हा केवळ उद्धव ठाकरे यांचा अपमान नसून संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांचा आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे. एका बेजबाबदार केंद्रीय मंत्र्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल असं वक्तव्य केल्यानंतर संतप्त शिवसैनिक गप्प बसू शकत नाही. याला जबाबदार नारायण राणे आहेत. त्यांनी पोलिसांना शरण जावं,” असंही विनायक राऊत यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
Shivsena MP Vinayak Raut criticize Narayan Rane over controversial statement