मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची संध्याकाळी मुंबईत बैठक होणार आहे. उध्दव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे, अशी माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिलीये. ही बैठक मुंबईतील वर्षा निवास्थानी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची उद्या दिल्लीत बैठक आहे. राज्यातील सर्वच काँग्रेस (Congress) आमदारांना दिल्लीत बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. शिवसेनेचे 29 आमदार फुटल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. राज्याच्या राजकारणामध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्लीमध्ये आहेत. मुंबईप्रमाणे दिल्लीतही अनेक घडामोडी घडत आहेत. विधानपरिषद निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आमदार अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. याच सर्व गोष्टींमुळे आज सकाळी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून छगन भुजबळ मुंबईकडे रवाना झाले आहेत. शरद पवार देखील दुपारपर्यंत मुंबईमध्ये दाखल होती, त्यानंतर ते बैठक घेतील.
शिवसेनेच्या खासदारांची बैठक आज पाच वाजता होईल, स्वत: मुख्यमंत्री ही बैठक घेणार आहेत. नुकताच भाजपाने शिवसेनेचे 35 आमदार आमच्याकडे असल्याचा दावा केला आहे. मात्र हा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. हे खरे आहे की, आमचे काही आमदार आमच्या संपर्कात नाहीत. मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा संपर्क झाल्याचे राऊतांनी सांगितले आहे. राज्यात भूकंप वगैरे काही येणार नाही, असा दावाही राऊतांनी केला. पुढे राऊत म्हणाले की, काही गैरसमज झाले असेल तर ते दूर केली जातील. भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा शिवसेनेच्या पाठीत केला गेलेला वार आहे.