मुंबई : काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस पक्षाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. (Shivsena Saamana Editorial on Congress struggle for the survival In Politics)
उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशामागे ब्राह्मण मतांची बेरीज
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतही दारुणरीत्या पराभूत झालेले जितीन प्रसाद हे अखेर भाजपवासी झाले आहेत. प्रसाद हे काँग्रेसचे तरुण नेते. त्यांचे घराणे परंपरागत काँग्रेसचे. हे महाशय मनमोहन मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर विधानसभा, लोकसभा हरत राहिले. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांच्या येण्याचा उत्सव भाजपमध्ये साजरा केला जात आहे. यामागे उत्तर प्रदेश निवडणुकांचे जातीय गणित आहे. जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे. आता उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत. याचा दुसरा अर्थ असाही काढता येईल की, उत्तर प्रदेशातील भाजपचा पाठीराखा असलेला उच्चवर्णीय मतदार आता त्यांच्यापासून दूर जात आहे.
आतापर्यंत उत्तर प्रदेशात इतर कोणत्याही गणितांची व चेहऱ्यांची गरज भारतीय जनता पक्षाला लागली नव्हती. फक्त नरेंद्र मोदीच सब कुछ हेच धोरण होते. राममंदिर किंवा हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत होती. आता उत्तर प्रदेशात प्रकृती इतकी खालावली आहे की, जितीन प्रसाद यांच्याकडून ब्राह्मण मतांचा आधार घ्यावा लागत आहे. जितीन प्रसाद हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता व भाजपमध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही. प्रश्न तो नसून काँग्रेस पक्षातील शेवटचे शिलेदारही आता नौकेवरून टणाटण उडय़ा मारू लागले आहेत हा आहे. पुन्हा हे फक्त उत्तर प्रदेशातच घडतेय असे नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं.
पडझडीमध्ये उरल्यासुरल्या काँग्रेसला फटका
राजस्थानात सचिन पायलट यांनी आता पक्ष नेतृत्वास निर्वाणीचा इशारा दिला आहे. सचिन पायलट व त्यांचे समर्थक केव्हापासून अस्वस्थ आहेत व त्यांचा एक पाय बाहेर आहेच. सचिन पायलट यांनी वर्षभरापूर्वी बंडच केले होते. ते कसेबसे थंड केले तरी आजही खदखद सुरूच आहे. पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांच्या विरोधात बंडखोर गटाने आरपारची लढाई सुरू केली आहे. त्यात प्रसाद यांच्यासारखे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जातात तेव्हा चिंता वाढते. ‘जी 23’ या काँग्रेसच्या बंडखोर गटाचे सदस्य असलेले जितीन प्रसाद व त्यांचे कुटुंब हे काँग्रेसनिष्ठच होते. त्यांच्या पिताश्रींनी सोनिया गांधी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. सचिन पायलट यांचे पिताश्री राजेश पायलटही त्याच पद्धतीचे बंडखोर होते, पण त्यांनी कधी पक्ष सोडण्याची भाषा केली नव्हती. दुसरे महत्त्वाचे नेते मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे यांनीही मध्य प्रदेशातील 22 काँग्रेस आमदारांसह पक्ष सोडला व कमलनाथांचे सरकार कोसळले. या पडझडीमध्ये उरल्यासुरल्या काँग्रेसला फटका बसत आहे.
काँग्रेसची अस्तित्वासाठी झुंज
पश्चिम बंगालात काँग्रेसचा खतरनाक पराभव झाला. केरळात काँग्रेसची स्थिती चांगली असतानाही सत्ता स्थापन करता आली नाही. आसामात संधी असतानाही काँग्रेस मागे पडली. सत्ता असलेले पुद्दुचेरी गमावले. या सगळय़ा पडझडीत काँग्रेसने काय करावे आणि कसे उभे राहावे? यावर चर्चा होत नाही. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही अशी मागणी ‘जी 23’चे बंडखोर नेते वारंवार करीत आहेत. काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख राष्ट्रीय तसेच विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केले. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचे भांडवल आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. देशाचा राजकीय समतोल बिघडविणारे हे चित्र आहे. लोकशाहीला मारक असलेली ही स्थिती आहे. पक्षांतर्गत बंडाळय़ा या होतच असतात. त्यापासून भाजपसारखे पक्षही मुक्त नाहीत, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
आधीच काँग्रेसमध्ये पोकळी, त्यात तरुण नेत्यांनी भाजपमध्ये जाणे बरे नाही
प. बंगालातील भारतीय जनता पक्ष आज सैरभैर झाला आहे व निवडणुका जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेसमधून उधारीवर घेतलेले सर्वजण पुन्हा स्वगृही निघाले आहेत. सुवेन्दू अधिकारी यांच्याविरोधात तर मुकुल रॉय यांनी उघड बंड केले. हे बंड भाजप नेत्यांना शमविता आलेले नाही. उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध मोदी असा सुप्त संघर्ष सुरू असल्याचे ‘मीडिया’ रिपोर्ट आहेत. हे सर्व जरी असले तरी मोदी, शहा, नड्डा यांचे नेतृत्व मजबूत आहे व भाजपचे पक्ष संघटन जमिनीवर आहे. जुने गेले तरी नवे उभे करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. निवडणुका जिंकण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही मुद्दा असू शकत नाही, पण प्रसाद यांच्या रूपाने काँग्रेसला खिंडार पाडल्याचा उत्सव भाजपने सुरू केला आहे, तो मनोरंजक आहे. जितीन प्रसाद, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे हे अलीकडच्या काळातील काँग्रेसचे तरुण चेहरे होते व त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे (Shivsena Saamana Editorial on Congress struggle for the survival In Politics)
Horoscope 11th June 2021 | मिथुन राशीने एकाग्र राहावे, तूळ राशीने कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य#Horoscope #HoroscopeToday #FridayFeeling #राशीफल #राशीभविष्यhttps://t.co/27C3HUaSQ6
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2021
संबंधित बातम्या :
‘मोदी-ठाकरेंच्या भेटीची चर्चा करतात त्यांचा अभ्यास कमी’, रोहित पवारांचा भाजपला टोला
VIDEO: विधानसभा, लोकसभाही महाविकास आघाडी एकत्रित लढणार?; शरद पवारांचं मोठं विधान, वाचा सविस्तर