मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावरच्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी पटोलेंना टोमणा मारला होता. ‘नाना पटोले छोटा माणूस आहे, मी त्यांच्यावर काय बोलू?’ असं पवार म्हणाले होते. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) नानांच्या राजकारणचं मोठेपण सांगताना पवारांचा टोमणा हाच नाना पटोले यांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे असं म्हटलं आहे. कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले, असंही सांगायला राऊत विसरले नाहीत.
“शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे”, असं राऊत म्हणाले. “कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नानांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून काँग्रेसला जमिनीवरून हवेत आणले. काँग्रेस त्यामुळे घोंघावत आहे. नाना बोलतात व काँग्रेस घोंघावते किंवा डोलते… नाना आधी भाजपमध्ये होते. मोदी यांना चार गोष्टी सुनावून त्यांनी पक्षत्याग केला आणि काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली. महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल.
नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला जागे करून पुढे नेणार आहेत. या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींना दिली आहे काय? देशातील अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन पडली आहे व त्या प्रत्येक राज्यात नानांना द्रोणागिरी पर्वत उचलून त्यातली संजीवनी गुटिका द्यावीच लागेल. लक्ष्मण मुर्छीत झाला तेव्हा हनुमानाने हेच केले होते, पण येथे नक्की कोण मुर्छीत झाले आहे व हनुमानाच्या भूमिकेत कोण आहे? ते पाहायला हवे.
महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिला. नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं शरद पवार यांनी म्हटलं. पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही पवारांनी त्यांना अनुलेखाने टाळलं.
(Shivsena Sanjay Raut Comment On Sharad pawar Taunt Nana patole Samana Editorial)
हे ही वाचा :
…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी सांगितलं कारण!
नाना रांगडे गडी, ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही : संजय राऊत