मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखामधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पटोले यांनी काँग्रेसचे नेतृत्व हाती घेतल्यापासून ते आतापर्यंतची परिस्थिती, त्यांची दरदिवशी खळबळ निर्माण करणारी वक्तव्यं यावर राऊतांनी आजचा सामना अग्रलेख लिहिला आहे. पटोले नेमके काय आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांची वक्तव्यं का चर्चेत असतात, यावर आजचा अग्रलेख आहे. अग्रलेख वाचल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील भारावून जातील असा हा अग्रलेख आहे. नाना पटोले विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत. ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अजिबात अवलंबून नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल, असं आजच्या अग्रलेखात राऊत म्हणाले.
लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी ‘ताव’ मारला की, ‘आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही.’ नाना पुढे असेही म्हणाले की, ‘काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे’. नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही, असं राऊत अग्रलेखात म्हणतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार ‘स्वबळा’स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही, असं राऊत म्हणाले.
नाना पटोले हे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना…. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो. मग लोकांना वाटते आता महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार. तीन पक्षांत वाद, फाटाफूट होणार व सरकार पडणार, पण तसे काहीच घडत नाही व नाना त्यांच्या पुढच्या कामास म्हणजे बोलण्यास लागतात. आता पुन्हा नानांच्या ताज्यातवाण्या वक्तव्याने चहाच्या पेल्यातले वादळ निर्माण झाले असे म्हणतात.
महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला जागे करून पुढे नेणार आहेत. या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींना दिली आहे काय? देशातील अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन पडली आहे व त्या प्रत्येक राज्यात नानांना द्रोणागिरी पर्वत उचलून त्यातली संजीवनी गुटिका द्यावीच लागेल.
(Shivsena Sanjay Raut on Congress Nana Patole Saamana Editorial)
हे ही वाचा :
भाजपा बहुजन समाजविरोधी पक्ष, मुंडे, खडसेंचा वापर करुन डावलले : नाना पटोले
महाविकास आघाडीतील कुरबुरी पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
पंकजा मुंडे नाराज नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा; राजीनामे न देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन