‘मोदी, शाहांचे सरकार कुबड्यांवरचे’, संजय राऊत यांचे रोखठोक वक्तव्य, म्हणाले ‘ईडी, सीबीआय नसेल तर…’
ईडी व सीबीआय ही त्यांची तगडी व अवजारे आहेत. व्यापाऱ्यांचे राज्य येते, तेव्हा शौर्य आणि स्वाभिमानाचा ऱ्हास होतो. महाराष्ट्राला आता आपला बाणा दाखवावा लागेल", असे संजय राऊत यांनी सांगितले.
Sanjay Raut Target PM Modi : “मोदी-शहांच्या हाती ईडी, सीबीआय नसेल तर ते काहीच करू शकणार नाहीत. महाराष्ट्राला आता आपला बाणा दाखवावा लागेल”, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘सामना’ वृत्तपत्राच्या ‘रोखठोक’ सदरातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाहांवर निशाणा साधला.
“आता आपला बाणा दाखवावा लागेल”
“ब्रिटिशांचे राज्य हे व्यापाऱ्यांचे राज्य होते. ते गेले. गुजरातच्या एका ‘बनिया’ने त्यांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्याच गुजरातमधल्या व्यापाऱ्यांचे राज्य पुन्हा देशावर आले. ईडी व सीबीआय ही त्यांची तगडी व अवजारे आहेत. व्यापाऱ्यांचे राज्य येते, तेव्हा शौर्य आणि स्वाभिमानाचा ऱ्हास होतो. महाराष्ट्राला आता आपला बाणा दाखवावा लागेल”, असे संजय राऊत यांनी सांगितले.
व्यापारी हा धाडसी नसतो
“भारतीय जनता पक्षाचे लोक हे व्यापारी आहेत. व्यापारी हा धाडसी नसतो. पंतप्रधान मोदी एकदा म्हणाले होते, “गुजरातचे व्यापारी हे आपल्या जवानांपेक्षा जास्त धाडसी असतात. ते जास्त धोका पत्करतात.” मोदी हे ज्या राज्यातून येतात त्या राज्यातील किती टक्के लोक भारताच्या सैन्यदलात आहेत”, असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
महुआ मोईत्रांच्या भाषणावेळी मोदींनी पळ काढला
“मोदी व शहांसमोर बहुसंख्य खासदारांनी त्यांच्या भाषणात निर्भयपणे सांगितले, ‘ईडी आणि सीबीआय हीच तुमची हत्यारे आहेत. ती नसतील तर तुमच्यात दम नाही. तुम्ही डरपोक शिरोमणी आहात.’ हे खरेच आहे. लोकसभेत प. बंगालच्या महुआ मोईत्रा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातून पळ काढला. मोदी यांना उद्देशून महुआ म्हणाल्या, “मि. मोदी, थांबा. माझे भाषण ऐकून जा. माझ्या कृष्णनगर मतदारसंघात तुम्ही दोन वेळा आलात, पण मी विजयी झाले. कृष्णनगरला आपल्याला भेटता आले नाही. तुम्ही माझे भाषण ऐकून जा.” पण श्रीमती मोईत्रा यांचे भाषण ऐकण्याची हिंमत पंतप्रधान मोदी दाखवू शकले नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.
“ईडी व सीबीआयच्या कुबड्यांवर”
“कारण त्यांचे सरकार कुबड्यांवरचे आहे. तसे त्यांचे शौर्यही ईडी व सीबीआयच्या कुबड्यांवरचे आहे. मोदी-शहांच्या हाती ईडी, सीबीआय नसेल तर ते काहीच करू शकणार नाहीत. शौर्य वगैरे तर पुढचा विषय”, असे संजय राऊत यांनी म्हटले.