बाणा जपला, आम्ही लाचार नाही, ‘सामना’तून शिवसेनेची ‘गिरे तो भी टांग उपर’
मुंबई : गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सत्तेत राहून, सत्तेची फळं खाऊन सुद्धा सत्तेतील मित्रपक्ष भाजपविरोधात वारंवार बोलणाऱ्या आणि गेल्या वर्षा-दीड वर्षांपासून स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपसोबत युती केलीच. अपेक्षित कारणे देत शिवसेनेने आपली भाजविरोधी तलवार म्यान केली आणि भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली. त्यानंतर ‘सामना’च्या संपादकीय लेखातून काय भूमिका जाहीर केली जाते, याची सर्वांनाच उत्सुकता […]
मुंबई : गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सत्तेत राहून, सत्तेची फळं खाऊन सुद्धा सत्तेतील मित्रपक्ष भाजपविरोधात वारंवार बोलणाऱ्या आणि गेल्या वर्षा-दीड वर्षांपासून स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपसोबत युती केलीच. अपेक्षित कारणे देत शिवसेनेने आपली भाजविरोधी तलवार म्यान केली आणि भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली. त्यानंतर ‘सामना’च्या संपादकीय लेखातून काय भूमिका जाहीर केली जाते, याची सर्वांनाच उत्सुकता होती. कारण ‘सामना’च्या अग्रलेखातून कित्येकदा भाजपवर शाब्दिक टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. मात्र, ते टीकास्त्र ‘शाब्दिक’च होते, हे युती करुन शिवसेनेने सिद्ध केल्यानंतर, आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘गिरे तो भी टांग उपर’चं दर्शन घडवलं आहे.
“देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.”, असे म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपसोबतच्या युतीचं लंगडं समर्थन शिवसेनेने सुरु केले आहे.
सामनात नेमके काय म्हणण्यात आले आहे?
“2014 नंतर तलवारी उपसल्या व पुढील चार वर्षे प्रत्येकजण तलवारीस धार काढीत राहिला. पण शिवसेनेची तलवार दुधारी आहे. आई भवानी मातेची आहे. न्याय, सत्यासाठी तळपणारी आहे. आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण ‘वारे’ आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही.”
“जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली आहे.” अशी टीका ‘सामना’तून विरोधकांवर करण्यात आली आहे.
“शेवटी विचार, भूमिका जुळत नसले, माणसांशी टोकाचे भांडण असले तरी राजकारणात पुन्हा एकत्र येण्यासाठी जे परवलीचे शब्द आहेत ते म्हणजे ‘राष्ट्रीय व्यापक हित’, ‘जनहित’ व ‘जनतेची इच्छा’. या इच्छेनुसार काँग्रेसची महाआघाडी बनू शकते, नितीश कुमार वगैरे पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बसू शकतात, मग शिवसेना तर त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बरोबरीची हिस्सेदारच आहे.” असे म्हणत ‘सामना’तून भाजपसोबतच्या युतीचं समर्थन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शिवसेना-भाजपची युती
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.