ठाकरे गटात तुमच्यावर कोणती जबाबदारी असणार? वसंत मोरे म्हणाले…
वसंत मोरे तब्बल 100 गाड्यांचा ताफा घेऊन पुण्याहून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. यापूर्वी वसंत मोरे यांनी त्यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार याबद्दल भाष्य केले.
Vasant More Join Shivsena : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित गटात गेलेले वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होणार आहे. वसंत मोरे तब्बल 100 गाड्यांचा ताफा घेऊन पुण्याहून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. यापूर्वी वसंत मोरे यांनी त्यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार याबद्दल भाष्य केले.
मी नक्कीच पूर्ण करेन – वसंत मोरे
वसंत मोरे यांनी पुण्याहून निघण्यापूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत संवाद साधला. यावेळी त्यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला कोणता शब्द देण्यात आला होता का? किंवा तुमच्यावर कोणती जबाबदारी असणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. “मला कोणताही शब्द देण्यात आलेला नाही आणि मी कोणताही शब्द घेतलेला नाही. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मार्गदर्शक संजय राऊत, आदित्य ठाकरे या सर्वांच्या मार्गदर्शननुसार मी आज पक्षात प्रवेश करत आहे. मला पक्ष जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेन”, असे वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरेंकडून मनसेलाही खिंडार
वसंत मोरेंसोबत आज मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यावेळी वसंत पवारांनी मी यापैकी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाला सांगतोय की ज्यांना पक्षात राहायचं ते राहू शकतात. परंतू पक्षात जे राजकारण सुरु होतं, हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता ते सर्व त्यांच्या मर्जीने ठाकरे गटात प्रवेश करत आहेत, असे वसंत मोरेंनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत पराभव
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
यानंतर वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी महापालिका, विधानसभा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी कार्यकर्त्यांचा कौल घेतला. तो कौल घेतल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की मी सुरुवातीपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे, असे वसंत मोरेंनी सांगितले होते.