‘युतीच्या काळात सेनेला मिळालेली वागणूक सर्वज्ञात, शिवसेना भाजपसोबत जाणार नाही’, बाळासाहेब थोरातांचा दावा
भाजपने वेळोवेळी शासकीय यंत्रणांचा वापर करुन दबावतंत्राचा वापर केलाय. त्याचा त्रास आमदारांना होत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. सरनाईक यांनी त्यांची व्यथा मांडली आहे, असं थोरात म्हणालेत.
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम सुरु असल्याचा खळबळजनक दावा प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात केलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु होऊन, राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळण्याच्या चर्चेला उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद-विवाद नसल्याचं सांगत हे सरकार 5 वर्षे टिकेल असा दावा केलाय. (ShivSena will not go with BJP, claims Congress leader Balasaheb Thorat)
भाजपने वेळोवेळी शासकीय यंत्रणांचा वापर करुन दबावतंत्राचा वापर केलाय. त्याचा त्रास आमदारांना होत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. सरनाईक यांनी त्यांची व्यथा मांडली आहे, असं थोरात म्हणालेत. त्याचबरोबर मागील 5 वर्षात भाजपनं शिवसेनेला दिलेली वागणूक सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नाही, असा दावाही थोरातांनी केलाय. समन्वय समितीच्या बैठकीत कुणाची काही नाराजी असेल तर या विषयावर चर्चा केली जाईल, असंही थोरात म्हणाले. त्याचबरोबर शरद पवार यांच्या विरोधी पक्षांच्या मोट बांधण्याच्या प्रयत्नावरही थोरात यांनी भाष्य केलंय. भाजपला दूर ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचं काम शरद पवार यांनी याआधीही केलं आहे. ते संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचेही महत्वाचे घटक असल्याचं थोरात म्हणाले.
नाना पटोलेंचाही भाजपवर गंभीर आरोप
भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला. त्याच शिवसेनेला भाजपा आता त्रास देत आहे, हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे भाजपाला पहावत नसून त्यांची खूर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
पटोले म्हणाले की, राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी आटापीटा करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई करत आहेत. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे.
संबंधित बातम्या :
जावेद अख्तर ते प्रितीश नंदी, यशवंत सिन्हा ते फारुक अब्दुल्ला, शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण येणार?
ShivSena will not go with BJP, claims Congress leader Balasaheb Thorat