Sanjay Raut : 200 जागा निवडून आणण्याची भाषा दिल्लीची, आम्हीच 100 जागा जिंकू; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : 200 जागा जिंकण्याची त्यांची भाषा नाही. दिल्लीची भाषा आहे. उद्धव ठाकरेंनी कालच सांगितलं घ्या मध्यावधी निवडणुका आम्ही तयार आहोत. आता निवडणुका झाल्यातर 100हून अधिक जागा जिंकून आणू.
मुंबई: माझ्यासोबत आलेला एकही आमदार पडणार नाही. प्रत्येक आमदार निवडून येईल. एवढेच नव्हे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकून आणू. आम्ही 200 आमदार विजयी केले नाही तर मी गावाला शेती करायला जाईल, अशी भीष्म प्रतिज्ञाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी विधानसभेत काल केली. शिंदे यांच्या या विधानाची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. 200 जागा जिंकण्याची भाषा ही त्यांची नाही. ही तर दिल्लीची भाषा आहे, असा चिमटा संजय राऊत (sanjay raut) यांनी काढला. आम्हीही 100च्यावर जागा जिंकून आणू. लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. खदखद आहे. शिवसैनिक इरेला पेटला आहे. त्यामुळे आता निवडणुका झाल्या तर आम्ही 100 हून अधिक जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनीही हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या, असं आव्हान केलं आहे. त्यामुळे हे आव्हान स्वीकारावं सरकारने, असंही ते म्हणाले.
200 जागा जिंकण्याची त्यांची भाषा नाही. दिल्लीची भाषा आहे. उद्धव ठाकरेंनी कालच सांगितलं घ्या मध्यावधी निवडणुका आम्ही तयार आहोत. आता निवडणुका झाल्यातर 100हून अधिक जागा जिंकून आणू. कारण आम्ही असली आहोत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. इतरांची नाही. पक्षाच्या जोरावर कुणाला हायजॅक करू शकत नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या केवळ पैसे मिळाले नाही, आणखी काही मिळाले. त्या आणखी काहीमध्ये आणखी गोष्टी आहेत, असा राऊत यांनी केला.
आमदार, खासदार गेल्याने मतदार जात नाही
मुख्यमंत्र्यांनी 200 जागा निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असेल तर आनंद आहे. आम्ही त्यांच्यावर का बोलावं? आम्ही शिवसेना म्हणून 100च्यावर जागा निवडून आणू. लोकांमध्ये जो उत्साह आणि चीड दिसतेय. त्यामुळे शिवसेना 100च्या वर जागा जिंकेल असं आम्हाला दिसतंय. काही आमदार आणि खासदार गेले म्हणजे मतदार गेला असं होत नाही. शिवसैनिक कुठे जात नाही. तुम्ही ठाकरे स्मारकांवर जा, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हा, किंवा कुठेही जा. पण तुमची इतिहासात नोंद वेगळ्या पद्धतीने होईल, असं राऊत म्हणाले.
बाळासाहेबांची तीच भूमिका असती
राणे, भुजबळ गेले तेव्हा बाळासाहेबांची काय भूमिका होती. तीच भूमिका आता त्यांनी ठेवली असती. बाळासाहेबांनी शिंदेंबाबत वेगळी भूमिका ठेवली नसती, असंही त्यांनी सांगितलं.