संजय राठोडांसाठी शिवसेनेचं खास ‘सोशल डिस्टन्सिंग’? नागपुरात शिवसैनिक चार हात लांब
संजय राठोड यांनी पोहरादेवीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासून गर्दी जमवल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. | Sanjay Rathod
नागपूर: पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत आता शिवसेनेनं (Shivsena) खास ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही स्थानिक शिवसैनिक हजर नव्हता. विशेष म्हणजे संजय राठोड हे नागपूरचे संपर्कमंत्री आहेत. तरीही संजय राठोड यांच्या स्वागतासाठी एकही शिवसैनिक न येणे, ही सूचक बाब मानली जात आहे. (Shivsena workers try to keep distance from Sanjay Rathod)
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी पोहरादेवीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासून गर्दी जमवल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे शिवसैनिक नागपूर विमानतळावर फिरकले नाहीत, असे समजते. पोहरादेवीत गर्दी जमल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तशीच वेळ आपल्यावर येऊ शकते, अशी भीती शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे मातोश्रीवरूनच आदेश आल्यामुळेच स्थानिक शिवसैनिक विमानतळावर आले नसावेत, अशी शक्यताही राजकीय जाणकारांकडून बोलून दाखविली जात आहे.
‘दीड तासांनंतर मुख्यमंत्री भेटले, अवघ्या दोन मिनिटांत भेट आटोपली’
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात गंभीर आरोप होऊनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई केली नव्हती. मात्र, कोरोनाच्या काळात पोहरादेवीत गर्दी जमवून संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळेच बुधवारी वर्षा बंगल्यावर आलेल्या संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागले. त्यानंतरही उद्धव ठाकरे अवघी दोन मिनिटं राठोड यांच्याशी बोलून निघून गेले. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेकडून संजय राठोड यांच्याबाबत कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री आणि पवारांची बैठक, राठोडांवरील कारवाईचे संकेत?
शरद पवार यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावरुन जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीचं कागदावरचं निमत्त कोरोनाचं होतं. मात्र, राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर अवघ्या काही तासांत ही बैठक झाल्यामुळए राठोडांचा विषय हा महत्वाचा मुद्दा बनला. पूजा चव्हाण प्रकरणात आलेलं संजय राठोड यांचं नाव, त्यांचं 15 दिवस गायब असणं, त्यावर भाजप नेत्यांचे गंभीर आरोप. तसंच पुणे पोलिसांच्या तपासावरही भाजपने उपस्थित केलेली शंका, त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे. अशावेळी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही बैठक म्हणजे राठोडांवरील कारवाईचं काऊंटडाऊन असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळांत रंगताना पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या :
संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?
नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत
(Shivsena workers try to keep distance from Sanjay Rathod)