Kirit Somaiya : किरीट सोमय्यांवर पोलिसांची कारवाई, शंभूराज देसाई आणि प्रविण दरेकर काय म्हणाले?
शंभूराज देसाई यांनी आम्ही किरीट सोमय्यांना तिथं जाता येणार नाही असं सांगितलं होतं, असं म्हटलं. तर, प्रविण दरेकर यांनी पोलिसांच्या मार्फत ठाकरे सरकारची दंडेलशाही सुरु असल्याचं म्हटलंय.
मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांना रत्नागिरीतील दापोली पोलीस ठाण्यात पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. शंभूराज देसाई यांनी आम्ही किरीट सोमय्यांना तिथं जाता येणार नाही असं सांगितलं होतं, असं म्हटलं. तर, प्रविण दरेकर यांनी पोलिसांच्या मार्फत ठाकरे सरकारची दंडेलशाही सुरु असल्याचं म्हटलंय. तर, दुसरीकडे किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि निलेश राणे यांना दापोली पोलिसांनी अटक केलीय. आता रत्नागिरी पोलीस किरीट सोमय्यांना जिल्ह्याबाहेर सोडणार आहेत, ही माहिती खुद्द सोमय्यांनी दिली आहे.
शंभूराज देसाई काय म्हणाले?
आम्ही किरीट सोमय्यांना तिथं जाता येणार नाही असं सांगितलं होतं. आमचे स्थानिक पोलीस निर्णय घेतील. वरिष्ठ पातळीवरुन कोणताच हस्तक्षेप नसल्याचं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय.आमचे अधिकारी कोणत्याही दडपणात नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं पोलिसांचं काम आहे. कोणी हेकोखोरपणानं जाणीवपूर्वक कायदा मोडण्याचं काम करणार असतील तर पोलीस त्यांचं काम करतील, असं शंभूराज देसाई म्हणाले. निलेश राणे यांचं म्हणनं चुकीचं असल्याचं देसाईंनी म्हटलं. किरीट सोमय्यांचं म्हणनं त्यांनी लेखी स्वरुपात पोलिसांकडे द्यावं. पोलीस ते तपासतील आणि गुन्हा दाखल करतील, असं शंभूराज देसाई यांनी टीव्ही 9 मराठी शी बोलताना सांगितलं आहे. पोलीस वारंवार सांगत असताना, मनाई करत असताना, वैयक्तिक मालमत्तेतं जाण्याचा प्रयत्न करणं अयोग्य आहे. किरीट सोमय्यांची आम्हाला काळजी असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
सोमय्यांना अटक केल्यास आश्चर्य वाटायला नको : प्रविण दरेकर
किरीट सोमय्यांना अटक केल्यास आश्चर्य वाटायला नको, असं प्रविण दरेकर म्हणाले होते. सरकारची पोलिसांच्या माध्यमातून दंडेलशाही महाराष्ट्र पाहतोय. सोमय्यांच्या मागणीची दखल न घेता तेच दोषी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारची गोष्टी चालू देणार नाही, अशी स्थिती निर्माण केली जातीय. तर, आतंकवादी येतात काय अशा प्रकारे तिथं फोर्स लावण्यात आली होती, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. एसपी बोलत नाहीत, एसपींना कोणीतरी सूचना देतंय. हेकेखोर पणा कोण करतंय हे महाराष्ट्राची जनता पाहतंय. एसपींनी हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याची गरज होती. एसपींकडून वरुन आलेल्या सूचनांनुसार काम सुरु आहे. एसपी समोर न येता पडद्यामागून काम करत आहेत, असं प्रविण दरेकर म्हणाले.
आम्हाला पोलिसांनी अटक केलीय : किरीट सोमय्या
आम्ही जो सत्याच्या आग्रहासाठी आलो होतो. त्यासाठीचा आग्रह अजून सुरु आहे. सर्व्हे नंबर 446 जे रिसॉर्ट बांधले आहेत ते अनिल परब यांचे आहेत. अनिल परब यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 30 तारखेला दापोली कोर्टात सुनावणी सुरु आहे भारत सरकारच्या याचिकेवर सुरु आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट तुटेपर्यंत तो रिसॉर्ट बांधण्यासाठी जो पैसा खर्च करण्यात आला त्यासंदर्भात ईडी, आयटी, ग्रीन ट्रिब्युनलकडे तक्रार केलीय. पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पलीकडे सोडणार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
इतर बातम्या:
‘आमचा घात करायचा आहे का?’ निल सोमय्यांचा संतप्त सवाल, किरीट सोमय्यांचा तासाभरापासून ठिय्या सुरुच