श्रद्धा वालकरचे वडील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, ‘तो’ खून कोणत्या सरकारच्या काळात? राजकीय भांडवल होणार?
श्रद्धाच्या मोबाइलचे लोकेशन दिल्लीत आढळल्याने मुंबई पोलिसांनी हे प्रकरण दिल्लीकडे वर्ग केले होते. दिल्ली पोलिसांना या प्रकरणी शंका आल्याने त्यांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर सगळं हत्याकांड उघड झालं.
मुंबईः श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात एकिकडे आरोपी आफताब पुनावाला (Aftab Punawala) याची विविध तपासण्यांद्वारे चौकशी होत आहे. तर दुसरीकडे मुंबईत मोठी नाट्यमय घडामोड घडली. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. या भेटीमागे काही राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा मुद्दा शिजतोय का, अशी चर्चा मुंबईच्या वर्तुळात सुरु आहे. विकास वालकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या हेदेखील तेथे उपस्थित होते.
फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीला श्रद्धा वालकर खूनाच्या तपास प्रकरणात हवे ते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन फडणवीसांनी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानण्यात आले. तर श्रद्धाच्या तक्रारीला पोलिसांनी वेळीच सहकार्य केले असते तर ती जिवंत राहिली असती अशी खंतही बोलून दाखवली.
श्रद्धा वालकर हिचा खून 18 मे 2022 रोजी झाला असून त्यापूर्वी तिने पोलिसांना तिला होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली होती, असे पत्रही यापूर्वी सादर करण्यात आले आहे. तसेच श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रारही वसई पोलिसांकडे केली होती. तत्कालीन पोलिसांनी श्रद्धाला सहकार्य केले नाही, त्यामुळेच तिच्यावर ही वेळ आल्याचा आरोप केला जातोय. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी हीच बाब आज निदर्शनास आणून दिली.
Shraddha murder case | Mumbai: I was against the relationship of Shraddha Walker and Aaftab Poonawala. I was unaware of the domestic violence Shraddha was subjected to by Aaftab. I feel, his family members knew everything about what he was doing with her: Vikas Walker pic.twitter.com/ynqCPdfvPc
— ANI (@ANI) December 9, 2022
ते म्हणाले, ‘डॉ. नीलमताई गोऱ्हे व आमदार किरीट सोमय्या यांनी माझ्या घरी येऊन चौकशी केल्याबद्दल धन्यवाद. विशेषतः सोमय्या यांनी आतापर्यंत दिल्लीत जाण्या-येण्यासाठी विमान खर्च, खाणे-पिणे राहण्याची व्यवस्था, सोय केल्याने, गाडीची व्यवस्था करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आतापर्यंत झालेल्या तपासात दिल्ली व वसई पोलीस सध्या व्यवस्थित सुरु आहे. सुरुवातीला तुळीज पोलीस स्टेशन व वसई माणिक पोलीस स्टेशन यांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे मला त्रास सहन करावा लागला. तसे झाले नसते तर आज माझी मुलगी जिवंत असती. किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती. मुलीसाठी न्याय मिळावा, यासाठी सहकार्य हवे आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.
आफताब पुनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूर हत्या केली आहे. त्याचे वडील, भाऊ आदींचीही चौकशी होऊन, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. या कटात इतर कुणीही शामिल असतील त्यांचीही चौकशी करून त्यांनाही शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही विकास वालकर यांनी व्यक्त केली.
18 वर्षानंतर व्यक्तीला स्वातंत्र्य दिले जाते, त्यावर विचार व्हायला हवा. काही अॅपवर विचार करून धर्मजागृती होण्यावर भर दिला गेला पाहिजे. तसेच माझ्या मुलीचे जे झाले, ते अत्यंत दुःखदायक असून यापुढे असे कुणाचेही होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे, असे विकास वालकर म्हणाले.
श्रद्धाचा खून म्हणजे क्रौर्याची परिसीमा
श्रद्धा वालकर ही पालघर येथील रहिवासी असून ती आफताब पुनावाला सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मे 2022 च्या पहिल्या आठवड्यात ती दिल्लीत होती. दोघांनी १४ मे रोजी महरौली येथे छतरपूर येथे एक घर भाड्याने घेतलं होतं. 18 मे रोजी दोघांमध्ये वाद झाल्याने आफताबने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर पुढील दोन महिने तो छतरपूरच्या जंगलात विविध ठिकाणी तिच्या अवयवांचे तुकडे फेकत होता.
अनेक दिवस श्रद्धाशी संपर्क न झाल्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. श्रद्धाच्या मोबाइलचे लोकेशन दिल्लीत आढळल्याने मुंबई पोलिसांनी हे प्रकरण दिल्लीकडे वर्ग केले होते. दिल्ली पोलिसांना या प्रकरणी शंका आल्याने त्यांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर सगळं हत्याकांड उघड झालं.
आरोपी आफताब पुनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलंय.