ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी, तारीख, ठिकाण एकच!! कुठे रंगणार सामना? कोण ठरणार प्रभावी?
आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे या दोघांच्या सभांना किती गर्दी होते, कुणाचे भाषणातील मुद्दे प्रभावी ठरतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दत्ता कनवटे, औरंगाबादः महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील राजकीय संघर्षाकडे लागलंय. याच ठाकरे आणि शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच एका ठिकाणी आमने-सामने येणार आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) या दोघांची सभा एकाच ठिकाणी एकाच दिवशी होणार आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाकडून परस्परांना वारंवार आव्हान दिलं जातंय. त्यातूनच औरंगाबादमधील एका मतरदारसंघात नुकताच आदित्य ठाकरे यांनी मेळावा घेणार अशी घोषणा केली. त्यानंतर आज लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेदेखील तेथेच, त्याच दिवशी सभा घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
येत्या 7 नोव्हेंबर रोजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात हा सामना रंगणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड हा अब्दुल सत्तार यांचा मतदार संघ आहे. आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन सिल्लोडमधून निवडून यावं, असं आव्हान सत्तार यांनी दिलं होतं.
तसंच सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना छोटा पप्पू, 2 नंबरचा पप्पू या नावानेही संबोधून त्यांची खिल्ली उडवली. त्यामुळे शिवसेनेतर्फे सत्तार यांच्याच मतदार संघात आदित्य ठाकरेंचा मेळावा ठेवण्यात आला आहे. तर 8 नोव्हेंबर रोजी शिंदे गटातील आमदार व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठणमध्ये आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे.
आदित्य उद्धव ठाकरे शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबादेत येत आहेत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे. तर यात्रेच्या पूर्वतयारीसाठी अंबादास दानवे हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात तयारी करत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
तर आदित्य ठाकरेंच्या सभेला प्रतिआव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील मैदानात उतरले आहेत. सिल्लोडमध्ये ७ नोव्हेंबर रोजीच श्रीकांत शिंदे मेळावा आणि सभा घेणार आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांची पुढची पिढी पहिल्यांदाच सिल्लोडमध्ये आमने सामने येणार आहे.
या दोघांच्या सभांना किती गर्दी होते, कुणाचे भाषणातील मुद्दे प्रभावी ठरतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.