‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा ‘, देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

| Updated on: Dec 31, 2021 | 4:23 PM

निवडणुकीत भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला 11 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, तेली यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी त्यांचं कौतुक करत त्यांना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे.

राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा , देवेंद्र फडणवीसांचा सल्ला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurga District Bank Election) भाजपचा मोठा विजय झाला असला तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर राजन तेली यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणांनी हा राजीनामा देत असल्याचं सांगत सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं तेली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला 11 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, तेली यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचं कौतुक करत त्यांना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी 19 जागा न मिळाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला असला तरी राजन तेली यांचा पराभव झाला आहे. पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली आणि शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यातील लढतीत नाईक यांनी तेली यांचा पराभव केला.

फडणवीसांकडून राजन तेलींचं कौतुक आणि सल्ला

या विजयात राजन तेली यांचीही मोठी मेहनत होती. त्यांचा पराभव झाला असेल. मात्र, त्यांनी खचून जायचं कारण नाही. कारण समोरच्या बाजूला जे प्रत्यक्ष अध्यक्ष होते त्यांचा पराभव झालाय. आम्ही राजन तेली यांना पुन्हा सल्ला देऊ की त्यांनी पुन्हा नव्या दमानं आणि जोमानं कामाला लागलं पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय.

राणेंना मिळालेल्या नोटीसीवरुन फडणवीसांचा घणाघात

पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळालेल्या नोटीसीवरही फडणवीसांनी जोरदार टीका केलीय. ‘राजकारणामध्ये अशा प्रकारे पोलीसांचा दुरुपयोग करणे हे महाराष्ट्रात तरी होत नव्हतं. बंगाल वगैरेमध्ये झालं असतं तर वेगळी गोष्ट होती. पण आता तर महाराष्ट्रातही राजकीय विरोधकांना संपवून टाकायचं अशा प्रकारचा प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीनं चाललेला आहे. इथंच नाही, इतर ठिकाणीही चाललाय, आमच्या अनेक नेत्यांबद्दल चाललाय. त्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. देशामध्ये न्यायालये आहेत. तिथं आम्ही लढू. पण ही जी काही पद्धती आम्हाला दिसतेय ती काही योग्य नाहीय. पोलीसांचा गैरवापर करुन एकदा पोलीस दलातली शिस्त बिघडली तर ती परत येत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे’, असा इशाराच फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.

इतर बातम्या :

VIDEO : चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार; नारायण राणे गल्लीतील भांडण दिल्लीत नेणार

Narayan Rane: आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार, सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचं सूचक विधान