स्मिता वाघ यांच्याकडे संसदेत मोठी जबाबदारी, ‘या’ गटाचे करणार नेतृत्व
लोकसभेत खासदारांना आपले विषय नीट मांडता येत नाहीत. त्यामुळे अनेक खासदार नाराज होत असतात. प्रामुख्याने नवोदित महिला खासदारांना आपले विषय मांडण्यास अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने स्मिता वाघ यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली आहे.
खासदार म्हणून पहिल्यांदाच निवडून आलेल्या जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्याकडे संसदेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभेत खासदारांना आपले विषय नीट मांडता येत नाहीत. त्यामुळे अनेक खासदार नाराज होत असतात. प्रामुख्याने नवोदित महिला खासदारांना आपले विषय मांडण्यास अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने स्मिता वाघ यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. स्मिता वाघ यांच्याकडे लोकसभेतील 12 महिला खासदारांपैकी पक्षाने ‘प्रतोद’ म्हणजेच व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे.
स्मिता वाघ या जळगाव लोकसभा मतदारसंघातून पहिल्यादांच खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. ठाकरे गटाचे करण पवार यांचा त्यांनी पराभव केला होता. निवडणुकीपूर्वी भाजपचे नाराज नेते उन्मेश पाटील यांनी बंड केले आणि ठाकरे गटात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी सहकारी मित्र करण पवार यांनाही सोबत नेले होते. करण पवार यांचा जनसंपर्क पाहून ठाकरे गटाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, विद्यमान आमदार असलेल्या स्मिता वाघ यांनी निवडणुकीत करण पवार यांचा पराभव करून संसदेत प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान स्मिता वाघ यांची ‘प्रतोद’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निवडीवर प्रतिक्रिया देताना स्मिता वाघ यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानते असे सांगितले. महिला खासदारांचे दोन गट करण्यात आले आहेत. त्यातील एका गटाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे.
सगळ्यांना सभागृहात विषय मांडता यावे यासाठी ही विभागणी करण्यात आली आहे. संसदेत कामकाज सुरळीत व्हावे यासाठी ही जबाबदारी दिली आहे. आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी निभवणार आहोत. संघटनेत अनेक पदे घेतली आहेत. पण, पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि ही जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार मानते असे त्या म्हणाल्या.