Aaditya Thackeray :… तर आदित्य ठाकरेंची शिवसेनेतून हकालपट्टी होणार? होय, पण एकाच शक्यतेवर सर्व काही ठरणार
बंडखोर गटाकडून आम्हीच शिवसेना असं ठासून सांगितलं जातंय. त्यामुळे मुळ शिवसेनेला धोका निर्माण झाल्याचं मत जाणकार सांगतात. यामुळे काही शक्यता निर्माण झाल्या असून यामुळे ठाकरेंवर देखील याचा प्रभाव पडू शकतो, असं मत एका मोठ्या वेबसाईटला प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केलंय.
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिर परिस्थिती असून अवघ्या महाराष्ट्रानं पुन्हा एकदा सत्तासंघर्ष पाहिलाय. आधी देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचा (Devendra Fadnavis-Ajit Pawar) पहाटेचा शपथविधी, त्यानंतर सकाळीच शिळ्या झालेल्या बातम्या आणि आता शिवसेनेतील बंडखोरीमुळे पडलेलं महाविकास आघाडी सरकार. या सत्तांतराच्या घडामोडींमध्ये सर्वाधिक नुकसान हे शिवसेनेला झाल्याचं जाणकार सांगतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे गेलेली सत्ता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) चांगलीच जिव्हारी लागली आहे. तरीही त्यांच्या स्वभावातला संयम आणि सगळं काही गमावलेलं असताना काल फेसबूक लाईव्हमधून दिसून आलेली इच्छाशक्ती खूप काही सांगून जाते. हा झाला एक भाग.
आता एकनाथ शिंदे गटाचं बोलायचं झाल्यास. त्यांनी केलेला बंड इथेच थांबत नाही. बंडखोर गटाकडून आम्हीच शिवसेना असं ठासून सांगितलं जातंय. त्यामुळे मुळ शिवसेनेला धोका निर्माण झाल्याचं मत जाणकार सांगतात. यामुळे काही शक्यता निर्माण झाल्या असून यामुळे ठाकरेंवर देखील याचा प्रभाव पडू शकतो, असं मत एका मोठ्या वेबसाईटला प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केलंय. नवं सरकार आणि एकनाथ शिंदे गट भविष्यात नेमकं काय करू शकतो, याच्या काही शक्यता तज्ज्ञ, जाणकार आणि राजकीय पक्षांचे नेते मांडताना दिसतायत. कोणत्या शक्यता आहे पाहुया…
- नवं सरकार आल्यास काय होईल? – 1 जुलैला देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नवं सरकार आल्यास शिवसेनेचे अनेक निर्णय बदलू शकतात. यामुळे शिंदे गट अधिक सक्रिय होईल. यामुळे मुळ शिवसेनेला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- पहिले काम-सभापतींची नियुक्ती?- देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यानंतर ते पहिलं काम विधानसभेच्या सभापतींची निवड हे करतील. यामुळे अनेक गोष्टींवर तातडीनं निर्णय घेता येईल. नव्या सभापतींची निवड करणं हे देवेंद्र फडणवीस-शिंदे सरकारचा प्राधान्यक्रम असेल.
- शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं जाईल?- नव्या सभापतींची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं जाईल, असं जाणकार सांगतात. यासाठी शिंदे गटाकडून नवे सभापती निर्णय देऊ शकतात. यामुळे मुळ शिवसेनेला धक्का बसेल. तशी मान्यता मिळाल्यास मुळ शिवसेनेचं मोठं नुकसान होऊ शकतं
- शिंदे गटाची विलीन होण्याची अडचण दूर होईल?– नव्या सभापतींना एकनाथ शिंदे गटाला खऱ्या शिवसेनेची मान्यता दिल्यास छोट्या पक्षात विलीन होण्याची गरज नाही, असं काँग्रेसच्या एका नेत्यानं एका वेबसाईटला सांगतिलं. यामुळे मुळ शिवेसेनेला धक्का बसेल असंही ते म्हणालेत.
- शिवसेना पुन्हा कोर्टात जाईल?- नव्या सभापतींनी एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना असल्याचं मानल्यास मुळ शिवसेना कोर्टात जाईल. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतील वाद उफाळून येऊ शकतो, असंही काँग्रेसच्या त्या ज्येष्ठ नेत्यानं सांगितलंय.
- …तर आदित्य ठाकरेंनाही शिवसेनेतून काढतील- शिंदे गट नव्या सरकारच्या काळात शिवसेना म्हणून ओळखला गेला तर ते आदित्य ठाकरेंनाही पक्षातून काढायला मागेपुढे पाहणार नाही, असं मतही काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मांडलंय. त्यामुळे पुन्हा एकदा खरी शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून येऊ शकतो.