शिंदे गटाचे इतके आमदार भाजपात जाणार, पहिली आणि दुसरी उडी कोण घेणार, सुषमा अंधारे म्हणाल्या,…
एकनाथ शिंदेंचा पण गेम भाजपच करणार आणि ४० पैकी २० भाजपत जाणार आहेत. त्यात पहिली उडी शहाजीबापू आणि दुसरी उडी तानाजी सावंत टाकणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
सोलापूर : सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा आज सोलापुरात होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. सुषमा अंधारे म्हणाल्या, ९० रुपयांचे तेल २०० वर गेले. दाळीपेक्षा चिकन परवडायला लागले. म्हणून लोक म्हणाले चिकन खाऊ का. कॅगचा अहवाल सांगतो. ३५ टक्के लोकांनी सिलेंडर घेणे बंद केले. डोळे उघडा रे मित्रांनो, असं म्हणत त्यांनी मोदींची मिमिक्री करत उज्वला गॅस योजनेची आठवण करुन दिली.
कॅग हा केंद्र सरकारचा आहे. तो सांगतोय की उज्वला योजनेतील लोकांनी ५० टक्के लोकांनी परत गॅस घेतला नाही. प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागली. म्हणून वैतागून माणूस विष घ्यायला गेला तर त्यावर पण जीएसटी आहे. ती थर्टी घेऊन मेल्यावर कापड आणायला गेले तर त्या कापडावर पण जीएसटी लावली, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला आणि मंत्री गुवाहाटीला. काय खेळ लावलाय. नरेंद्र मोदी यांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली का? मोदी यांना भीती वाटते का पत्रकार परिषदेची. बेरोजगारी दर ८ टक्के आहे. बेरोजगारी, महागाईवर भारत देश जगातल्या टॉप १२ मध्ये आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारले असे सांगणारा व्हिडिओ लावला. तलवारीने या माणसाला मारले तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. ज्या रुग्णालयात हा माणूस आहे त्या रुग्णालयाने अद्याप रिपोर्ट दिला नाही. बार्शीतील गणेश शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली म्हणून तलवारीने हल्ला केल्याचा अंधारेंचा आरोप आहे.
आपण महागाईवर बोललो की ते गाई गाई करतात. देवेंद्र फडणवीसांना फक्त सत्ताकारण करायचे आहे. एकनाथ शिंदेंचा पण गेम भाजपच करणार आणि ४० पैकी २० भाजपत जाणार आहेत. त्यात पहिली उडी शहाजीबापू आणि दुसरी उडी तानाजी सावंत टाकणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.