म्हणून शरद पवार यांना छत्रपती घराण्याचं महत्त्व पटलं; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
टीव्ही9 मराठीने लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये हा सोहळा सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनापासून ते पवार घराण्यातील फुटीवर भाष्य केलं. तसेच ठाकरे गटाला आलेल्या ऑफरवरूनही संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
मुंबई | 1 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. काही मातब्बर नेते आणि प्रभावी व्यक्तींना निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच श्रीमंत शाहू महाराज हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाकडून ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उतरण्याची शक्यता आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
टीव्ही 9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी त्यांची मुलाखत घेतली. उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं. शरद पवार यांचा पक्ष आहे. त्यांनी कुणालाही तिकीट द्यावं. कुणाला ते तिकीट देत असतील तर आमची ना नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तोपर्यंत महत्त्व पटत नव्हतं
मी मोठेपणा करणार नाही. करायचं नाही. पण एक गोष्ट सांगतो. भाजपने जेव्हापासून संभाजीराजे, उदयनराजे असतील किंवा इतर राजघराणे सोबत जोडली, तेव्हा शरद पवार यांना या राजघराण्याचं महत्त्व पटलं. तोपर्यंत त्यांना या राजघरणाच्याचं महत्त्व पटत नव्हतं. जो सन्मान या राजघराण्याला द्यायला हवा होता तो दिला नाही. ठिक आहे. आता देत आहेत तर चांगलं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
पण म्हणून युती होईल असं नाही
मनसेसोबतच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं. मनसेसोबत युतीची कोणतीही चर्चा झाली नाही असं सांगतानाच मनसेसोबतचे कोणतेही मतभेद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांच्याशी आमचे संबंध आहेत. राज यांनी हिंदुत्वाची भूमिका मान्य केली आहे. आधी त्यांची प्रादेशिक भूमिका होती. ती व्यापक नव्हती. प्रादेशिक अस्मिता असली पाहिजे. ती अडचणीची नाही. पण प्रादेशिक अस्मिता म्हणजे राष्ट्रवादाला विरोध नसावा. आता राज ठाकरे यांनी राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांना आमचा विरोध नाही. आमचे विचार जुळत आहेत. पण याचा अर्थ युती होईल असं नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.