महाराष्ट्रभर दौरा पक्षप्रमुखांचा मात्र नियोजन सांगितले रामदास कदमांनी..!
दसरा मेळावा झाला की, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर फिरणार आहेत. पक्ष संघटन आणि आपली बाजू काय ते थेट जनतेमध्ये जाऊन मांडणार आहेत. ही बाब चांगली आहे. पण यापूर्वीच असे दौरे झाले असते तर पक्षावर ही वेळ आलीच नसती असेही कदम म्हणाले आहेत.
गोविंद ठाकूर, Tv9 मराठी, मुंबई : दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रभर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्याला सुरवात होणार आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि खासदारांच्या मतदार संघात दौरे केले होते. आता त्यानंतर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत. हा दौरा शिवसेनेचा असला तरी तो कसा असणार हे शिंदे गटाचे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीच सांगून टाकले आहे. ज्या 40 आमदारांनी बंड केले त्याच मतदारसंघात पक्ष प्रमुख यांचे दौरे होतील असा अंदाज कदमांनी वर्तवला आहे. तर हे दौरे यापूर्वीच झाले असते तर शिवसेनेचे दोन मेळावे झालेच नसते असेही म्हणत बंडखोरीची वेळ ही पक्ष नेतृत्वामुळेच आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दसरा मेळावा झाला की, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर फिरणार आहेत. पक्ष संघटन आणि आपली बाजू काय ते थेट जनतेमध्ये जाऊन मांडणार आहेत. ही बाब चांगली आहे. पण यापूर्वीच असे दौरे झाले असते तर पक्षावर ही वेळ आलीच नसती असेही कदम म्हणाले आहेत.
पक्ष नेतृ्त्वावर टीकास्त्र करताना रामदास कदम यांनी शिवसेनेवर असलेल्या प्रमेचाही दाखला दिला आहे. मुंबई शहरात शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत ही अभिमानाची नाही आत्मपरिक्षणाची बाब असल्याचे ते म्हणाले आहेत. एक पाऊल मागे घेतले असते तर ही वेळही आली नसती असेही ते म्हणाले आहेत.
पक्षातील बंडानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना काय मिळालं? पण आम्ही मात्र दोघांनाही गमावलं असल्याचे कदमांनी सांगितले आहे. पक्षात उभी फूट होऊ दे पण राष्ट्रवादी-कॉंग्रेसला सोडणार नाही हा एवढा हट्ट कशासाठी असा सवाल करीत पक्ष फुटीला कोण जबाबदार आहे हे देखील त्यांनी अप्रत्यक्ष सांगितले.
आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी दोन आमदार द्यावे लागले तेव्हा हा विजय झाला. त्यामुळे प्रत्येक आमदाराला जिंकण्यासाठी काय करावे लागते हे देखील आपल्याला माहित आहे. आम्हीही निवडणूक लढवली असल्याचा दाखला रामदास कदमांनी दिला.
वांद्र्याच्या एकाच प्रभागात तीन कॅबिनेट मंत्रीपद द्यावे लागले होते. दोन कॅबिनेट आणि एक मुख्यमंत्री पद याच भागात राहिले होते. एवढा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या काय चुका झाल्या याचा दाखला रामदास कदम यांनी दिला आहे.