सोलापुरातील उमेदवार महास्वामींची संपत्ती केवळ 9 रुपये, मात्र कर्ज तब्बल…
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारंसघातून दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, तर भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी रिंगणात आहेत. या बड्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी चडचणचे रहिवशी असलेले व्यंकटेश्वर महास्वामी यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञानापत्रातील माहितीनुसार, महास्वामींची एकूण […]
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारंसघातून दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, तर भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी रिंगणात आहेत. या बड्या उमेदवारांना टक्कर देण्यासाठी चडचणचे रहिवशी असलेले व्यंकटेश्वर महास्वामी यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञानापत्रातील माहितीनुसार, महास्वामींची एकूण संपत्ती केवळ 9 रुपये आहे. मात्र, महास्वामींवर 45 हजार रुपयांचे हातउसने घेतलेले कर्ज आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ यंदा स्वामींच्या उमेदवारींमुळे चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपच्या वतीने डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी उमेदवारी दाखल केला. त्याचवेळी व्यंकटेश्वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दाखल केले असून, फक्त नऊ रुपये हाती असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले पॅनकार्ड त्यांनी काढले आहे.
व्यंकटेश्वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे. कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आहे. 31 वर्षीय व्यंकटेश्वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉमची पदवी मिळवली आहे.
निवडणूक लढविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती त्यांनी घेतली आहे. या महाराजांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. एकीकडे कोट्यधीश महाराज निवडणूक रिंगणात असताना केवळ नऊ रुपये हाती आणि 45 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले महास्वामी रिंगणात कितपत टिकाव धरून राहतात, या बाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या :
सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामींकडे 3 कोटींची संपत्ती, मात्र पॅनकार्ड नाही!
100 ग्रॅम सोनं, 5 किलो चांदी, डॉ. प्रीतम मुंडेंची संपत्ती किती?