सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत टक्केवारीचा मुद्दा समोर आला होता. त्यावरूनच नाना पटोले यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. महाराष्ट्रात 50 टक्के नव्हे तर शंभर टक्के रेट आहे. राज्याच्या तिजोरीतील 1000 कोटी केवळ सरकारच्या जाहिरातीसाठी खर्च केले. जे लोक चांगले काम करतात त्यांना जाहिरात करावी लागत नाही. कर्नाटकातले सरकार 40% लूट करत होते तर महाराष्ट्रातले 100% लूट करत आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
या आधी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. त्यावेळी जागा वाटप करताना आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. पण आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण काँग्रेसच्या 44 जागा आहेत. तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावरून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. नाना पटोले यांनी दोन ओळींची प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही मोठे भाऊ असा काँग्रेसने कधीच असा घमंड केला नाही. अजित दादांना काय बोलायचं काय नाही यावर मी बोलणार नाही, असं ते म्हणालेत.
माझा भाजपला सवाल आहे. केरळ, गोवा आणि नॉर्थ ईस्टमध्ये गायीचं काय झालं? महाराष्ट्रातील जनतेला भाजपने प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे. तिथे गाय खायची वस्तू आणि इथे म्हणजे आई असते. मात्र असे धार्मिक तेढ निर्माण करून भाजपला निवडणुका जिंकता येणार नाहीत. गाय भाजपची कधीच आई झालेली नाही. गाईच्या नावाने फक्त राजकारण करू शकते. भाजपाचा खरा चेहरा आता समोर आला आहेत, असं नाना पटोले म्हणालेत.
गंगेचा पाणी वाटून तीर्थ म्हणून भाजपवाले पैसे गोळा करू शकतात. गंगा नदी साफ केले म्हणून सांगितले आणि गंगा पूर्णपणे साफच करून टाकली. लोकांच्या घामाचा पैसा गंगा स्वच्छ करण्यासाठी वापरला मात्र तिथे अद्यापही घाणच घाण आहे. भाजपाचा अशा पद्धतीचा हिंदुत्वाचा बुरखा आता फाटलेला आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र डागलंय.
ना हनुमानजी सोबत आले,ना श्रीरामजी सोबत आले. हनुमानजी तर काँग्रेससोबत आले. हे कर्नाटकच्या निवडणुकीने दाखवून दिलं. भाजपची ही मानसिकता आता देवानेदेखील ओळखली आहे, असंही ते म्हणालेत.