Abu Azmi | देशात नग्न फोटो, लिव्ह इन, दोन पुरुषही सोबत राहिलेले चालतात मग हिजाब का नाही? सोलापूरात अबू आझमींचा सवाल
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतरावरून अबू आझमी यांनी तीव्र नाराजी दर्शवली. ते म्हणाले, 'औरंगजेब हे टोपी शिवून घर चालवत होते. मात्र त्यांनी कधीही सरकारी तिजोरीतून पैसे घेतले नाही.
सोलापूरः देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात. एक महिला लिव्ह इनमध्ये राहिलेली चालते. दोन पुरुष एकमेकांसोबत राहिलेले चालतात. मग हिजाबलाच (Hijab) काय अडचण आहे? हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय कसा घेतला जातो, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी (Abu Azmi) यांनी केला आहे. सोलापुरात (Solapur) आज अबू आझमी यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत देशातील काही प्रश्नांवर सणकून टीका केली. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरूनही त्यांनी शिवसेना-भाजसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. भाजप सत्तेत येऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले होते, 30 वर्षे सेक्युलर सरकार देऊ, मात्र कुणीही आपलं वचन पाळलं नाही, या शब्दात अबू आझमी यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली.
हिजाबलाच अडचण का?
आपल्या देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात. एक महिला दुसऱ्या पुरुषासोबत लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहिलेली चालते, दोन पुरुष एकमेकांसोबत पाहिलेले चालतात. मग हिजाबलाच काय अडचण आहे? असा सवाल अबू आझमी यांनी सोलापुरात केला. हिजाब घातलेल्या महिला चोरी करतील का, अशी भीती वाटत असेल तिथे महिला कर्मचारी लावा. देशात हिरोनेही नग्न फोटो काढलेले चालतात. या हिरोला माझा विरोध नाही, पण हिजाबला बंदी का, असा माझा सवाल असल्याचं अबू आझमी म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल
महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना आली तरीही पुढची ३० वर्षे सेक्युलर सरकार देऊ, असं आश्वासन मिळालं होतं, पण तसं झालं नसल्याचं अबू आझमी म्हणाले. सोलापुरात ते म्हणाले, ‘ देशात तेढ निर्माण केली जातेय. 2014 नंतर देशाला नजर लागलीय. मी कोणाला घाबरत नाही पण अल्लाहला घाबरतो. आम्ही देशात दहा वर्षे खायला मिळाले नाही तरी चालेल पण आम्ही देशात शांतता राखू. कॉंग्रेस राष्ट्रवादीला माझा प्रश्न आहे, सचिन वाझेविरोधात आम्ही शरद पवार आणि इतर लोकांकडे गेलो होतो. सचिन वाझेवर मर्डर केस सुरुय, त्यांना परत नोकरीवर कसे घेताय? मात्र त्याला परत घेतले आणि पुढे काय झाले ते पाहिले.. देशातील आरक्षण संपवण्याचे काम पाठीमागच्या दरवाजाने सुर आहे.
भारताची अवस्था श्रीलंकेप्रमाणे होईल…
अबू आझमी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले, ‘ आपल्या भारताची अवस्था ही श्रीलंकेप्रमाणे होईल. भारतावर 136 लाख कोटीचे कर्ज आहे. हे कोण फेडणार? आज भारतात एक मूल जन्मल्यावर 35 ते 40 हजाराचे कर्ज त्याच्या डोक्यावर असते..
औरंगाबाद नामांतरावर तीव्र नाराजी
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतरावरून अबू आझमी यांनी तीव्र नाराजी दर्शवली. ते म्हणाले, ‘औरंगजेब हे टोपी शिवून घर चालवत होते. मात्र त्यांनी कधीही सरकारी तिजोरीतून पैसे घेतले नाही. औरंगाजेबचे संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज यांच्यासोबत राजकीय लढाई होती धार्मिक लढाई नव्हती. त्यामुळे आजचे नामांतर हे केवळ धार्मिकतेतून होते..