Sonia Gandhi : मोदी सरकार आत्ममग्न, गांधी, नेहरू, पटेलांच्या नावाने खोटा इतिहास सांगितल्या जातोय; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Sonia Gandhi : आपल्या द्रष्ट्या नेत्यांमुळेच आपण एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक व्यवस्था स्थापित केली आहे. तसेच लोकशाही आणि संवैधानिक संस्थांनाही मजबूत केलं आहे. भाषा, धर्म, सांप्रदायिकता आणि विविधता असूनही भारताने एक अग्रणी देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे.
नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी संपूर्ण देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकार (modi government) आत्ममग्न सरकार आहे. गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या नावाने खोटा इतिहास सांगितला जात आहे. देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे. गेल्या 75 वर्षात प्रतिभावंत भारतीयांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर आपण विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि सूचना प्रसारण आदी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक भारतीयांच्या कष्टामुळेच हे साध्य झालं असून म्हणूनच आपण विकासात मोठी झेप घेतली आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही गेल्या 75 वर्षात अनेक मोठी उद्दिष्टे गाठली आहेत. मात्र, हे आत्ममग्न सरकार आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि गौरवशाली यशाला तुच्छ लेखण्याचं काम करत आहे. हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही. राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक गोष्टींची मोडतोड केली जात आहे. गांधी, नेहरू आणि पटेल आणि स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. आम्ही हे प्रयत्न मोडून काढू. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
उज्जवल भारताची कामना करते
आपल्या द्रष्ट्या नेत्यांमुळेच आपण एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक व्यवस्था स्थापित केली आहे. तसेच लोकशाही आणि संवैधानिक संस्थांनाही मजबूत केलं आहे. भाषा, धर्म, सांप्रदायिकता आणि विविधता असूनही भारताने एक अग्रणी देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे, असं सांगतानाच भारताच्या उज्ज्वल भविष्याची मी कामना करते, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
मोदींचाही हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करताना घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. तसेच देशातील नागरिकांनी एकजूट दाखवावी, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच देशातील प्रत्येक महिलांचा सन्मान करा. त्यांचा अपमान करू नका, असंही मोदी म्हणाले. मोदींनी भ्रष्टाचारावरून जोरदार हल्लाबोल केला. पण त्यांनी कोणत्याही राज्याचं नाव घेतलं नाही. मात्र, मोदींचा हा हल्ला बिहारपासून महाराष्ट्र आणि दिल्लीपासून पश्चिम बंगालमधील भ्रष्टाचारावर असल्याचं सांगितलं जात आहे.