अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कर्जत | 30 नोव्हेंबर 2023 : अजितदादा गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी मोठं आणि धक्कादायक विधान केलं आहे. 2019 सालची निवडणुक युतीला बहुमत देणारी होती, असं वेगवेगळ्या कार्यक्रमातून सांगितलं जातं. कौल अर्धा भाजप आणि अर्धा शिवसेनेच्या विरोधात जनतेने दिला होता. सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला पाठिंबा दिला हे अघटीत होतं, असं धक्कादायक विधान सुनील तटकरे यांनी केलं आहे. कर्जत येथे राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे. त्यात तटकरे बोलत होते.
पहाटे शपथविधी झाला. तो का झाला हे अजित पवार यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. जे सोबत नाहीत, ते देखील आता अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यावेळी एक पत्र तयार करण्यात आलं. त्यामधे ठाणे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्याने देखील सही केली होती, असा टोला सुनील तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादीच्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. सत्तेसाठी आम्ही भाजपसोबत गेल्याची टीका होत आहे. त्यात काही अर्थ नाही. आम्ही भाजपसोबत का गेलो हे आम्ही वारंवार सांगितलं आहे, असं ते म्हणाले. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री राष्ट्रवादी झाला असता. परंतु तसं होऊ दिलं नाही. ते का नाही होऊ दिलं? याचं स्पष्टीकरण अजित दादा तुम्ही आता द्यायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं.
अजित पवार यांच्यावर 2009 नंतर टीका सूरू झाली. त्यावेळीं पक्षाने तुमची बाजू घ्यायला हवी होती. परंतु पक्षाने ती घेतली नाही. त्याचं मला वाईट वाटलं, असंही ते म्हणाले. छगन भुजबळ, अजितदादा आणि माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. 1952 ते 2012 पर्यंत जो खर्च झाला तो 70 हजार कोटी रुपये होता. मग आमच्यावर 70 हजार कोटी रुपयांचा आरोप केला कसा? असा सवालच त्यांनी विचारला.
अजित पवार यांनी पक्ष स्थापन केल्यापासून फक्त पदे भोगली. दादा आणि संघटनेचा दुरान्वयेही संबंध नाही असं म्हणता. आता तूम्ही सांगा तुम्हांला हे पटत आहे का?, असा सवाल करतानाच निवडणुक आयोगासमोर सांगितलं अजित पवार यांनी काहीचं केलं नाही. मला त्यांना सांगायचं आहे की अजित पवार यांचा पक्षाच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.